Pune Eknath SHinde shivsena party workers Sarkarnama
पुणे

Pune Shivsena: पुणे शहरप्रमुख अन् जिल्हाप्रमुखांनी वाढवली मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी

Shiv Sena Shinde faction Pune Assembly: पुणे शहरा लगत असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक विधानसभा मतदारसंघ तरी शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे राखावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपने 99 उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील तीन उमेदवारांचा देखील समावेश आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवार यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अशातच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिंदेचे सैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगला वर उमेदवारी मिळण्याच्या मागणीसाठी पायी निघाले आहेत.

पुणे शहरा लगत असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक विधानसभा मतदारसंघ तरी शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) आपल्याकडे राखावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे इच्छुक आहेत.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले रमेश कोंडे हे देखील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेनेला एक जागा सुटेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आठ जागांपैकी सहा जागा भाजपला तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे पुणे शहरात शिवसेनेचा एक तरी आमदार हवा अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पुण्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानाकडे पायी रवाना झाले आहेत.

हडपसरमधून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांना उमेदवारी मिळावी याकरिता पुणे शहरातील शिवसेना आक्रमक झाली असून, हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी हडपसर पासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पायी चालत निघाले आहेत. हे शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हडपसर मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा यासाठी विनंती करणार आहेत.

दरम्यान एकीकडे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख असलेल्या रमेश कोंडे यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढणार असून त्यासाठी तलवारीला धार लावून ठेवले असल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे आता शहर प्रमुख असलेले नाना भानगिरे देखील उमेदवारीसाठी आक्रमक झाले आहेत.

आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. मात्र सध्या परिस्थितीत यापैकी कुठलाही मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुण्यातून मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT