Devendra Fadnavis and Nitin Nabin’s Pune Ganeshotsav visit Sarkarnama
पुणे

Pune Ganeshotsav: कसबा-दगडूशेठनंतर थेट भाजप पदाधिकाऱ्यांच्या मंडळांना भेटी; फडणवीस-नबीनांच्या गणेशदर्शनाची 'राजकिय चर्चा'

Devendra Fadnavis and Nitin Nabin’s Pune Ganeshotsav visit : देवेंद्र फडणवीस, नितीन नबीन आणि रवींद्र चव्हाण यांच्या पुणे गणेशदर्शन दौऱ्यात कसबा-दगडूशेठनंतर भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित मंडळांना भेटी देण्यात आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.

Sudesh Mitkar

Pune Ganeshotsav News: पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनाला दरवर्षी राजकीय नेत्यांच्या दौऱ्यात विशेष स्थान असते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुणे गणेशदर्शन दौऱ्यात यंदा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर दौऱ्याचा मोर्चा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संबंधित गणेश मंडळांकडे वळवला.

मानाच्या पाच गणपतींपैकी कसबा गणपती वगळता तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या चार गणपतींचा दौऱ्यात समावेश नव्हता. तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन गणपतीचेही दर्शन घेण्यात आले नाही. त्यामुळे भाजप नेत्यांच्या या दौऱ्याच्या प्राधान्यक्रमावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दगडूशेठ हलवाई गणपतीनंतर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मित्रमंडळाला तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित श्री साई मित्रमंडळ ट्रस्टला नेत्यांनी भेट दिली. त्यामुळे पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सवातील मानाच्या मंडळांपेक्षा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मंडळांना यंदा अधिक महत्त्व मिळाल्याचे चित्र दिसून आले.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील प्रमुख नेते पुण्यातील मानाचे पाच गणपती, प्रमुख मंडळे तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मंडळांना भेटी देतात. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठी तयारीही केली जाते. यंदा मात्र गर्दी आणि वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन दौरा मोजक्या मंडळांपुरता मर्यादित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच मंडळांना भेटी देणे शक्य नसल्याचे भाजपच्या वर्तुळातून स्पष्ट करण्यात येत आहे.

महापौरांच्या विनंतीनंतर दौऱ्यात अचानक बदल

फडणवीस आणि नबीन यांच्या नियोजित दौऱ्यात महापौर मंजूषा नागपुरे यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपतीच्या दर्शनाचा समावेश नव्हता. मात्र, महापौर नागपुरे यांनी विनंती केल्यानंतर दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला आणि भाजपचे वरिष्ठ नेते महापौर बंगल्यावर गणेशदर्शनासाठी पोहोचले. या भेटीची माहिती अनेक पदाधिकाऱ्यांना आधी नव्हती. नेते महापौर बंगल्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने तेथे धाव घेतली.

‘दर्शन’ की स्थानिक राजकीय संपर्क?

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पुणे दौरा संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असतानाच गणेशदर्शनाच्या निमित्ताने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मंडळांना मिळालेल्या प्राधान्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मानाच्या गणपतींच्या दीर्घ परंपरेऐवजी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी संबंधित मंडळांना भेटी देण्यामागे संघटनात्मक गणित होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दौरा मर्यादित ठेवण्यामागे गर्दी, वाहतूक आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात असले, तरी मानाच्या चार गणपतींसह पुण्यातील काही प्रमुख मंडळे दौऱ्याबाहेर राहिल्याने भाजपच्या गोटातच या दौऱ्याच्या नियोजनाची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT