Navnath Ban, Hemant Bagul Shivsena
पुणे

Pune Graduate Election: गप रे बन-पाव!’ पदवीधर निवडणुकीतील पराभवावरून भाजप-शिवसेनेत जुंपली; पुण्यातून संघर्षाला सुरवात

BJP Shiv Sena Dispute: पदवीधर निवडणुकीतील निकालानंतर भाजपचे नवनाथ बन आणि शिवसेनेचे हेमंत बागुल यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पुण्यातील जागा, मित्रपक्षांचे सहकार्य आणि महायुतीच्या एकजुटीवरून वाद पेटला.

Sudesh Mitkar

Pune Graduate Election News : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेने अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.

त्याला शिवसेनेचे युवासेना प्रमुख हेमंत बागुल यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. ‘गप रे बन-पाव! सगळ्या जागा तुम्हालाच पाहिजेत का?’ असा सवाल बागुल यांनी भाजपला केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील धुसफूस आता उघडपणे समोर आली आहे.

पुण्यात सानपांना पाठिंबा, संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीविरोधात प्रचार

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुणे आणि नागपूरमध्ये शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने महायुतीच्या एकजुटीला धक्का बसल्याचे बन यांनी म्हटले. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीला विजय मिळवता आला असता, असा दावा बन यांनी केला. पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी मित्रपक्षांचे नुकसान झाल्याचा आरोप करत त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

‘पुण्यात एवढी ताकद असतानाही समाधान नाही का?’

नवनाथ बन यांच्या आरोपांना हेमंत बागुल यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. पुण्यात भाजपचे आठ आमदार, दोन खासदार, शंभरहून अधिक नगरसेवक आणि तीन ते चार मंत्री असतानाही भाजपला समाधान नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘पुण्याची एक जागा शिवसेनेला दिली असती, तर असा काय मोठा फरक पडला असता?’ असा प्रश्न विचारत बागुल यांनी जागावाटपावरून भाजपला लक्ष्य केले. महायुतीमध्ये शिवसेना केवळ भाजपची कामे करण्यासाठी आलेली नाही असं ते म्हणाले.

‘आपल्या पक्षापुरते बोला; दुसऱ्यांच्या विषयात नाक खुपसू नका’

नवनाथ बन यांनी दुसऱ्या पक्षाच्या विषयात हस्तक्षेप करू नये, अशा शब्दांत बागुल यांनी त्यांना सुनावले. महायुती ही केवळ सत्तेसाठी नसून परस्पर सन्मान, विश्वास आणि समन्वयावर चालणारी युती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून मित्रपक्षांचा सन्मान राखला पाहिजे, असा इशाराही बागुल यांनी दिला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतील निकालांनंतर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले असून, जागावाटप आणि परस्पर सहकार्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT