Pune Police Commissioner Amitesh Kumar Sarkarnama
पुणे

Pune Accident : बुंद से गेलेली पुणे पोलिस हौद भरून परत आणणार का? आता तपासासाठी दहा पथकं नियुक्त!

Mayur Ratnaparkhe

Pune News : केवळ पुणेच नव्हे, महाराष्ट्रभरही नव्हे तर देशभरात चर्चेचा आणि तेवढ्याच प्रमाणात संतापाचा विषय ठरत असलेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, आता पोलिसांनी दहा पथकं नियुक्त केली आहेत. खरंतर अपघात घडला त्या दिवशीच रात्री जर पोलिसांकडून कडक आणि कायदेशीर भूमिका घेतली गेली असती, तर कदाचित हे प्रकरण एवढं वाढलंही नसतं, असाही जनसामान्यातील सूर आहे.

सर्वसामान्यांच्या रागाचा भडका तेव्हा उडाला जेव्हा या अल्पवयीन आरोपीला घटनेच्या अवघ्या काही तासांमध्ये जामीन मिळतो. एवढच नाहीतर तर पोलिसांकडून त्याला बर्गरही खायला दिलं जातं आणि त्यात कहर म्हणजे त्याला दिली गेलेली शिक्षा काय तर एक निबंध लिहिण्याची? या सर्व घटनांमुळे सर्वसामान्य जनतेची तळपायाची आग मस्तकात गेली आणि मग याचा उद्रेक व्हायला सुरुवात झाली.

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं दिसल्यानंतर कदाचित पोलिसही ताळ्यावर आले, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. सरकारपातळीवर हालचाली वाढल्या. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, गृहमंत्री पुण्यात दाखल झाले आणि आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून पकडून आणलं गेलं. असं सर्वसामान्य जनतेतून बोललं जात आहे.

पुढे या आरोपीच्या कुटुंबीयांची कुंडली बाहेर निघाली, आधीच बडे बाप की बिघडी औलाद असा ठपका आरोपीवर बसलेला होताच, त्यात त्याच्या वडिलांचे, आजोबांचे म्हणजे अगरवाल कुटुंबाचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. तेव्हा कुठं मग आरोपी मुलाच्या वडिलांची, आजोबाची, कार चालकाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू झाली आहे.

आता या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाला त्यांची जबाबदारी निश्चित करून दिली आहे. महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासह तपासात एकसूत्रता राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

कल्याणीनगरमधील या अपघात प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास खडकी विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडे सोपविला आहे. तसेच, अल्पवयीन मुलाला मोटार चालवण्यासाठी आणि मद्य पार्टी करण्यासाठी परवानगी दिल्याप्रकरणी मुलाचे वडील आणि मद्य पुरविणाऱ्या पब चालकांवर स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करीत आहेत. या तपासात त्रुटी राहू नये, यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांसह या तपासातील इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी आत्तापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेण्यात आला.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी, साक्षीदारांचे जबाब सविस्तर नोंदविण्यात येत आहेत. महत्त्वाचे पुरावे गोळा करणे, तपासाचे डॉक्युमेंटेशन, सीसीटीव्ही, फॉरेन्सिक तपासणी, मुद्देमाल जप्त करणे, पेपरवर्क यासह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तपासात त्रुटी राहू नयेत, यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या तपासातील प्रगतीवर स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार लक्ष ठेवून असल्याचे अतिरिक्त आयुक्त बलकवडे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT