DCM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Pune MLC election : विधानपरिषदेचा धुरळा : पुण्यात 'स्थानिकच्या' गणितात भाजप, राष्ट्रवादीतच चुरस : महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच

Pune local authority constituency News : स्थानिकच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर संख्याबळ अधिक असल्याने भाजपचा डोळा दिसत आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच इच्छुक तयारीला लागले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Pune News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या होत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यातून होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. ही जागा तांत्रिकदृष्ट्या 6 डिसेंबर 2022 पासून रिक्त होती. मात्र, गेल्या चार महिन्याच्या काळात लांबणीवर पडलेल्या पुणे जिल्हयातील नगरपालीका, नगरपंचायत व महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या रिक्त जागेसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच महायुतीमधील मित्रपक्षातच जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. स्थानिकच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर संख्याबळ अधिक असल्याने भाजपचा डोळा दिसत आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच इच्छुक तयारीला लागले आहेत.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा आतापर्यंत इतिहास पाहिला, तर या जागेवर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणानुसार भाजपनेही येथे पाय घट्ट रोवले आहेत. त्यामुळे येत्या काळात जागावाटपात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदार संघातून 1998-2004 दरम्यान काँग्रेसचे शरदचंद्र रणपिसे आमदार होते. तर पिंपरी-चिंचवडमधील दिग्गज नेते स्व. लक्ष्मण जगताप यांनी 2004 मध्ये ही निवडणूक अपक्ष लढवून जिंकली होती.

त्यानंतरच्या काळात 2010 व 2016 या सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्थानिक राजकारणात आणि बँकिंग क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते. मात्र, 6 डिसेंबर 2022 मध्ये त्यांची मुदत संपल्यानंतर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने ही जागा रिक्त होती. आता पुणे जिल्ह्यातील नगरपालीका, नगरपंचायत व महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

या वेळेस स्थानिकच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेलया या मतदारसंघावर भाजपचा आकडा मोठा असल्याने डोळा दिसत आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच इच्छुकांची संख्या मोठी दिसत आहे. भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आठने संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे ऐनवेळी जागा कोणाला सुटणार यावर गणित अवलंबून असणार आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे संख्याबळ कमी दिसत आहे.

एकूण ७९६ सदस्य असून त्यामध्ये महायुतीमधील भाजप ३१७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ३०९, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७० असे एकूण ६९६ सदस्य आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना १७, काँग्रेस १७, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस १६ असे एकूण ५० संख्याबळ आहे. त्याशिवाय अपक्ष २० तर स्थानिक आघाडीचे २१ सदस्य आहेत.

नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक

बारामती, इंदापूर आणि जुन्नर, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ, चाकण, राजगुरूनगर, मंचर, देहू, आळंदी, दौंड, खेड आणि हवेली, जेजुरी, भोर सासवड आणि शिरूर या पुणे जिल्ह्यातील जवळपास १७ नगरपालिका व नगरपंचायतीमधील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १८३, भाजप ८८, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५५, काँग्रेस ४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)११, बसप १, रासप १, स्थानिक आघाडी २४, अपक्ष २७ असे एकूण ३९४ सदस्य आहेत.

पुणे जिल्ह्यातील झेडपी व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५१, भाजप १०, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)०६, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)०५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)०१ , एकूण ७३ सदस्य आहेत. या निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या सभापतीला मतदानाचा अधिकार असतो. त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या आहेत. बहुतांश ठिकाणी महायुतीची सत्ता असली तरी त्यापैकी ११ ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती आहेत. तर भाजपचे दोन ठिकाणी सभापती आहेत. दरम्यान, या आकडेवारीत पुणे जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे त्यांचे आकडेवारी यामध्ये दिलेली नाही.

पुणे महानगरपालिका पक्षनिहाय संख्याबळ

पुणे महानगरपालिकेत भाजप (BJP) ११९,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष २३, काँग्रेस १२, एकनाथ शिंदे शिवसेना ०७, उद्धव ठाकरे शिवसेना ०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ०२ असे एकूण १६८ सदस्य आहेत. तर १० स्वीकृत सदस्य असून त्यामध्ये भाजप ७, राष्ट्रवादी २ तर काँग्रेसचा एक सदस्य आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका पक्षनिहाय संख्याबळ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप ८४, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ३६, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ०२, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ०३, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ०१ असे एकूण १२८ सदस्य आहेत. तर १० स्वीकृत सदस्य असून त्यामध्ये भाजप ७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ३ सदस्य आहेत.

पुण्यात इच्छुकांची मांदियाळी

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. तरीही ही जागा कोणाला सुटणार? या नंतर उमेदवार ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या वाटाघाटीकडे लागले आहे.

SCROLL FOR NEXT