Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Lok sabha Election 2024 : 'पुण्यात काँग्रेसने सक्षम उमेदवार न दिल्यास..' ; पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी!

Chaitanya Machale

Pune Lok Sabha Constituency and Mahavikas Aghadi : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार नक्की कोण असतील याबाबत अद्यापही कोणतीही घोषणा झालेली नाही. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्याचा संकल्प राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि मित्र पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून केला आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार आहे. महायुतीने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केले आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी त्या क्षमतेचा उमेदवार काँग्रेसने द्यावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील शरद पवार यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही आग्रही मागणी करण्यात आली. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसने सक्षम उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला शिरूर, बारामती या मतदारसंघात त्रास वाढणार आहेत, काँग्रेसच्या उमेदवाराबाबत कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

पुणे लोकसभेबाबत चर्चा झाली. भाजपने मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महाआघाडीचा उमेदवार देताना काँग्रेसने सक्षम उमेदवार दिला पाहिजे, त्यामुळे भाजपची प्रमुख प्रचार यंत्रणा पुण्यातच अडकून राहिली पाहिजे. काँग्रेसने किरकोळ उमेदवार दिल्यास त्याचा फटका जिल्ह्यातील इतर लोकसभा मतदारसंघात बसू शकतो.

महाआघाडीचा उमेदवार स्ट्रॉंग नसेल तर भाजपची यंत्रणा शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघात अधिक क्षमतेने कार्यरत होईल, त्याचा फटका या दोन्ही मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो, असा अंदाज या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

इंडिया आघाडीची गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाईल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा झाला प्रवेश -

मोदीबागेत बुधवारी दिवसभर शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठका झाल्या. यावेळी राज्यभरातील अनेक नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपासह इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यामध्ये मनसेचे माजी नगरसेवक राहुल तुपेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आरिफ बागवान, शेतकरी कामगार संघटनेचे प्रवक्ते भगवान जाधव, दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक सुनील माने यांचा सामावेश होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT