पुणे

Pune Lok Sabha News : पुणे लोकसभेबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांची भूमिका स्पष्ट , म्हणाल्या...

MP Medha Kulkarni : अब की बार 400 पार भाजपचा नारा नाही, तर लोकांची इच्छा!

Sudesh Mitkar

Pune News : कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने त्या आता खासदार झाल्या आहेत. खासदार झाल्यानंतर कुलकर्णी या अॅक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. खासदार कुलकर्णी यांनी बुधवारी सकाळीच शहराचा दौरा करत विविध भागात जाऊन महापुरुषांना अभिवादन करत आशीर्वाद घेतले.

या दौऱ्यानंतर खासदार कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही राजकीय जीवनात काम करतो. त्यामुळे त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पुणे शहरातील सर्व पदाधिकारी पुढील काळामध्ये एका दिलाने काम करण्यास सुरुवात करणार आहोत. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या मेळाळ्यामधून नवीन प्रेरणा मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

हा उत्साह घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. पुढील काळात खासदार म्हणून जबाबदारी पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न तसेच विमानतळाचा प्रश्न आणि इतर नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा केली जाईल. यामध्ये केंद्रीय पातळीवरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना खासदार कुलकर्णी म्हणाल्या, पुण्यातील प्रत्येक नागरिक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी आणि कार्यकर्तृत्वाने प्रेरित झाला आहे. मोदी यांचा विकासाचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला असून, त्यांनाच पंतप्रधान करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. त्यामुळे अब की बार 400 पार हा फक्त भाजपचा नारा नाही, तर लोकांची इच्छा आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिनिधी आणि भाजप उमेदवारच पुणे लोकसभेचा खासदार असेल ही 'काळ्या दगडावरची लखलखीत पांढरी रेघ' असल्याचं कुलकर्णी म्हणाल्या.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरदेखील खासदार कुलकर्णी यांनी भाष्य केले आहे, त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच मोठी रॅकेट पकडण्यात येत आहेत. अवैध व्यवसायांवर ताबडतोब कारवाई गृह खात्याकडून केली जात आहे. त्यातूनच ड्रग्जमाफिया आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येत आहे. पुढील काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत कशी राहील, यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

कोथरूड विधानसभेसाठी पक्षाचे आदेश हीच रणनीती

खासदारपदी संधी मिळालेल्या प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. आमदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले होते. मात्र, असे असताही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिले होते. आगामी कोथरूड विधानसभेच्या उमेदवारीबाबत खासदार कुलकर्णी यांना विचारले असता, त्या म्हणाल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचा आदेश हीच रणनीती आहे. पक्ष जो उमेदवार देईल, तो आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार आणि त्याला निवडून आणणारच.

Edited By : Chaitanya Machale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT