Ravindra Dhangekar sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar News: 'त्या' भाजप कार्यकर्त्यांवर इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर कारवाई करणार का? धंगेकरांचा सवाल

Pune Lok Sabha Election 2024 News: पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन केले म्हणून पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु, त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले होते, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही.

Sudesh Mitkar

Ravindra Dhangekar On BJP: पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन केले म्हणून पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु, त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले होते, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. भाजप (BJP) सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का? की लोकसभा निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या (India Alliance) बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा प्रश्न पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. पोलिसांनी एकाची बाजू झाकून ठेवणे आणि दुसऱ्यावर गुन्हा दाखल करणे, हे कितपत योग्य आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Pune Lok Sabha Constituency)

पुणे लोकसभा मतदारसंघाची 13 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले. म्हणून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि कार्यकर्त्यानी आंदोलन केले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना (Commissioner of Police) पत्र दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रवींद्र धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून (BJP) मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले. रात्रीच्या अंधारात सुरू असलेले हे पाप काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी उजेडात आणले. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही सहकार नगर पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नाही म्हणून लोकशाही मार्गाने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली.

पोलिसांची नेमकी भूमिका काय?

आंदोलन, उपोषण हे लोकशाहीने राज्यघटनेने या देशातील जनतेला बहाल केलेले अस्त्र आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. पण, दोन दिवसानंतर आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याचवेळी राजेंद्र शिळीमकर, विनोद वस्ते, सुभाष जगताप आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही सहकार नगर पोलीस चौकीबाहेर आंदोलन केले होते. त्याबाबतची बातमी विविध दैनिकात आणि वाहिन्यांवर प्रसिद्ध झाली होती. तरीही त्यांच्यावर कसल्याही स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत पोलिसांनी दाखल केला नाही. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का? की लोकसभा निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? हे जनतेला समजले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?

मतदानाच्या दिवशी पाटील इस्टेट भागात भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. हा प्रकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघड केला. पण पोलिसांनी आरोपींना सोडून दिले. याच दिवशी हेमंत रासने (Hemant Rasane) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फडके हौद परिसरात ठिय्या आंदोलन केले. हे प्रकरणही पोलिसांनी झाकून ठेवले. त्यांच्यावरही कसल्याही स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झाला नाही. आमच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे कारण काय? पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

तसेच पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला तसाच भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो अद्याप का दाखल झाला नाही, याबद्दल संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. वेगवेगळी वागणूक दिल्याबद्दल ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT