Pune MLC Election | BJP Pune Seat | Mahayuti Formula Sarkarnama
पुणे

Pune MLC Election : महायुतीत शेवटच्या क्षणी 'ट्विस्ट'; 'या' समीकरणामुळे पुण्याची जागा भाजपला मिळण्याची शक्यता!

BJP Pune Seat, Mahayuti Formula : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्‍या १६ मतदारसंघांसाठी १८ जून रोजी निवडणूक होत आहे. महायुतीमध्ये भाजप १०, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ अशा जागा वाटपाचा ढोबळ आराखडा ठरला असला, तरी कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार यावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 31 May : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघा एक दिवस उरला असताना, महायुतीमधील जागा वाटपाचा सस्पेन्स वाढला आहे. परभणीच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे आता पुण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.

शेवटच्या क्षणी परभणीऐवजी शिवसेनेला साताऱ्याची जागा सुटल्यास, पुण्याची जागा भाजपच्या पदरात पडू शकते. या बदलत्या समीकरणामुळे भाजपमधील इच्छुकांच्या आशा कमालीच्या उंचावल्या असून त्यांच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्‍या १६ मतदारसंघांसाठी १८ जून रोजी निवडणूक होत आहे. महायुतीमध्ये भाजप १०, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ अशा जागा वाटपाचा ढोबळ आराखडा ठरला असला, तरी कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार यावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

परभणीचा तिढा पुण्यात सोडवणार? भाजपचे जोरदार प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच पुणे, रायगड आणि परभणी या तीन जागांवर दावा ठोकला होता. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, परभणीची जागा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेतून तीव्र विरोध होत आहे. शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नाही.

राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील हा तिढा सोडवण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला येऊ शकतो आहे. जर शिवसेनेने परभणीची जागा सोडली आणि त्या बदल्यात शिवसेनेला साताऱ्याची जागा मिळाली. तर भाजपसाठी पुण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे भाजपने ही जागा स्वतःकडेच खेचण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला आहे.

उमेदवारीची गणिते: दोन्ही आघाड्यांमध्ये कमालीची उत्सुकता

महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुण्याचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे दोघे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाते यावरच उमेदवाराचे नाव ठरणार आहे. जर जागा भाजपला मिळाली, तर अनेक बड्या नेत्यांची नावे शर्यतीत आहेत.

तर दुसरीकडे, जागा राष्ट्रवादीकडे राहिल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून एखाद्या 'सरप्राईज' नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. महायुतीतील सर्व १६ जागांवर रविवारी किंवा सोमवार सकाळपर्यंत एकमत होण्याची शक्यता असून, त्यानंतरच पुण्याच्या जागेचा अंतिम सस्पेन्स संपणार आहे. परभणीच्या तिढ्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फायदा घेऊन भाजप पुण्यात बाजी मारणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT