Pune civic officer alleges harassment by BJP leader : पुणे महापालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याने भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात छळवणुकीची तक्रार थेट राज्य महिला आयोगाकडे दाखल केली आहे. संबंधित पदाधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात येऊन धमकी देतो, अरेरावी करतो, व्हिडीओ चित्रीकरण करतो आणि कामाच्या ठिकाणी असुरक्षित वातावरण निर्माण करतो, असा गंभीर आरोप महिलेने केला आहे.
या प्रकरणाची सुरुवात जानेवारी महिन्यात झाली होती. महिला अधिकाऱ्याने महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करत कार्यस्थळी सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातील अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेही तक्रार देण्यात आली होती. मात्र, समितीने सुनावणी घेतल्यानंतर पुढील कारवाईबाबत कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप संबंधित अधिकारीने केला आहे.
अखेर न्याय मिळत नसल्याने महिला अधिकारीने थेट राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार सादर केल्यानंतर आयोगाने दखल घेत महापालिकेला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे.
महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संबंधित भाजप पदाधिकारी अनेकदा 10 ते 12 कार्यकर्त्यांसह कार्यालयात येतो, माहिती अधिकारात माहिती मागण्याच्या नावाखाली अरेरावी करतो, तसेच व्हिडिओ शूटिंग करतो. कार्यालयात नसतानाही “तिला बघून घेतो,” अशा धमक्या दिल्या जातात, असे तक्रारीत नमूद आहे.
विशेष म्हणजे याच पदाधिकाऱ्याविरोधात यापूर्वी महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणे, सुरक्षारक्षकांसोबत वाद घालणे आणि अरेरावी करणे, अशा प्रकारांमुळेही त्याच्यावर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेने तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्याने पीडित महिलेला थेट महिला आयोगाची मदत घ्यावी लागली. आता या वादग्रस्त भाजप पदाधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शहर भाजपकडून या पदाधिकाऱ्याविरोधात कोणती भूमिका घेतली जाते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.