Pune Municipal Medical College News Sarkarnama
पुणे

Pune Municipal Medical College : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये वीस कोटींच्या 'वसुली'चे इंजेक्शन !

Municipal Medical College : या संदर्भात पैसे मागणाऱ्या महाविद्यायातील वरिष्ठालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

सरकारनामा ब्यूरो

ज्ञानेश सावंत

Pune News : गरीब, हुषार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी (एमबीबीएस) पुणे (Pune) महापालिकेने उभारलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये पात्र विद्यार्थ्यांकडूनच बेकायदेशीरपणे प्रत्येकी वीस लाख रुपयांची वसुली होत आहे. नियमित शुल्काचे साडेबावीस लाख रुपये भरूनही त्यावर एवढी रक्कम देण्याचा तगादा कॉलेजने लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. जादा वीस लाख, तेही एकरकमी, रोखीने भरल्याशिवाय प्रवेश न देण्याची भूमिका कॉलेजने घेतल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडू शकतात. अशाप्रकारे शंभर विद्यार्थ्यांकडून वीस कोटी रुपये उकळले जाऊ शकतात. भविष्यातील डॉक्टरांनाच जादा पैसे भरण्याचे 'इंजेक्शन' दिले जात असल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पैसे मागणाऱ्या महाविद्यायातील वरिष्ठालाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी पकडले आहे.

पुण्यातील एका विद्यार्थिनीला 'नीट' परीक्षेत पाचशेपेक्षा अधिक गुण मिळाल्याने पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला. त्यासाठी सुमारे साडेबावीस लाख रुपये प्रवेश शुल्क भरण्याची तयारी या विद्यार्थिनीच्या पालकांनी केली. या शुल्काच्या रकमेचा बँकेतून 'डिमांड ड्राफ्ट'ही (डीडी) काढला. पण, त्याआधीपासूनच त्यांना कॉलेजमध्ये रोज बोलावून जादा वीस लाख रुपये भरण्याचा आग्रह धरला. गंभीर म्हणजे, कॉलेजचे अधिष्ठाताच पैशांची मागणी करीत असल्याचा पालकांचा आरोप आहे.

मुळात, शुल्काची रक्कम भरण्यातही अडचणी असताना जादा वीस लाख रुपये कोठून द्यायचे, याचा ताण पालकांना आहे. विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारे प्रत्येकी वीस लाख रुपये घेतले जात आहेत. हा प्रकार महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवून त्याची खातरजमाही केली. कॉलेजमध्ये बेकायदा पैसे घेत असल्याच्या तक्रारी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या म्हणजे, पुणेकरांच्या पैशांतून उभारलेल्या या कॉलेजमध्ये 'वसुली' सुरू झाल्याचे दिसत आहे.

पुणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था व्यापक करण्यासाठी २०१० मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधींच्या नावाने मेडिकल कॉलेज सुरू करण्याची योजना होती. त्यात बदल करून २०१७ मध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज या नावाच्या कॉलेजलला मंजुरी दिली गेली. त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल साडेसहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलच्या जागेत या मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधण्यात येत आहे. प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोन वर्षापूर्वी शंभर विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू झाली.

इन्स्टिट्यूटनल कोटा कशासाठी ?

कॉलेजच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट असल्याने या कॉलेजमध्ये 'एमबीबीएस'च्या प्रवेशासाठी दोन टप्पे आहेत. ज्यात नियमित प्रवेशासाठी ७ लाख रुपये आणि संस्थात्मक (इन्स्टिट्यूटनल) कोट्यातील प्रवेशासाठी २२ लाख रुपये शुल्क आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे नियमित कोट्यात ८५ आणि संस्थात्मक कोट्यातून १५ जागा आहेत. सरकारी कॉलेजमध्ये एक ते दीड लाख रुपये शुल्क आहे. मात्र, हे कॉलेज ट्रस्टच्या माध्यमातून चालविले जात असल्याने दोन्ही टप्प्यांसाठी शुल्क निश्‍चित केले आहेत. दुसरीकडे हे कॉलेज महापालिकेच्या पैशांतून उभारले जात आहे. तेथील सेवा-सुविधांवरचा सर्व खर्च आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगारही महापालिकाच करणार आहे. त्यामुळे शुल्काव्यतिरिक्त एक नवा पैसाही जास्त घेणे अपेक्षित नाही. तरीही, अधिष्ठाताच पैसे मागत असल्याची तक्रार आहे.

या कॉलेजच्या व्यस्थापनासाठी ट्रस्ट नेमून, त्यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून कॉलेज चालविले जाणार असून, सध्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने कॉलेजच्या अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. त्यातून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT