Pune Anti Encroachment Drive, Naval Kishore Ram. Sarkarnama
पुणे

PMC Commissioner news : प्रसिद्धी लोलुप अन् वाचाळवीर, या बाष्कळ बडबडीला..! महापालिका आयुक्त 'त्या' माजी IAS अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले

Pune Municipal Corporation, Naval Kishore Ram, Pune Municipal Commissioner, Former IAS Officer, Retired IAS Officer : पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही, अशी टीका महापालिका आयुक्तांनी केली आहे.

Rajanand More

Pune Anti Encroachment Drive update : पुणे महापालिकेकडून मागील काही दिवसांत शहरांतील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या या कृतीचे पुणेकरांकडून स्वागतही केले जात आहे. शहरात काही ठिकाणी त्यांचे फलकही लागले होते. पण काही माजी अधिकाऱ्यांकडून टीकाही होत आहे. त्यावरून महापालिका आयुक्त चांगलेच भडकले आहेत.

महापालिका आयुक्तांच्या 'एक्स'वरील अधिकृत अकाऊंटवरून संबंधित अधिकाऱ्यांचा समाचार घेण्यात आला आहे. या लांबलचक पोस्टमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेण्यात आलेले नसले तरी त्यामध्ये महापालिकेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेले, सर्वात वरिष्ठ पदावर असताना असे उल्लेख करण्यात आले आहेत. महापालिकेतील सर्वात वरिष्ठपदी आयुक्त असतात. त्यामुळे नवल किशोर राम यांची ही पोस्ट माजी आयुक्तांबाबत असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन कसोशीने सतत प्रयत्नशील आहे. पुणेकरांचे जीवन अधिकाधिक सुकर कसे होईल या दृष्टीने काही पावले उचलण्यात येत आहेत. पारदर्शक पद्धतीने आणि व्यवसस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली सामासिक अंतरा (front margin) मधील व पार्किंग मधील अनधिकृत अतिक्रमण वरील मोहीम, असे सांगत कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे.

रस्त्याची पूर्ण क्षमता वापरता यावी आणि कोंडी कमी व्हावी ही त्या मागील भूमिका आहे. नागरिकांना त्या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेले व प्रसिद्धी साठी हपापलेले काही अधिकारी प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रत्येक कृत्याची टीका करताना दिसत आहेत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

स्वतः च्या social media वर तसेच उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक माध्यमाचा या साठी वापर करत असून सतत प्रशासनाची बदनामी कशी होईल यासाठी खटाटोप करत आहेत. तसेच त्यांच्या आधीचे आणि नंतरचे सर्व अधिकारी कसे बिनकामाचे होते/आहेत आणि फक्त ते स्वतः कसे सर्वञानी आहेत आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये असताना कशी क्रांती (?) घडवली होती यांच्या सुरस आणि तद्दन खोट्या कथा सांगत सुटले आहेत, अशा परखड शब्दांत संबंधित अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांनी समाचार घेतला आहे.

वास्तविक पाहता, हे सदगृहस्थ पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही. आता निवृत्ती नंतर काहीही काम हातात नसल्याने, नैराश्य पोटी, समाज माध्यमा कडे जाऊन हा सर्व नकारात्मक प्रयोग त्यांनी चालू केल्याचे दिसते, अशी टीका पोस्टमध्ये करण्यात आली आहे.

पुणे शहरा बद्दल मनापासून प्रेम आणि जिव्हाळा असता तर त्यांनी प्रशासनामध्ये systemic changes घडवून, त्या मध्ये पारदर्शकता आणली असती. तसेच, त्यांनी वेळेत योग्य ती पावले उचलली असती तर आज शहरात अशी परिस्थिती उद्भवली नसती हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. अशा प्रसिद्धी लोलुप आणि वाचाळवीर निवृत्त सनदी अधिकाऱ्याची या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत, असे कठोर शब्द पोस्टमध्ये वापरण्यात आले आहेत.

कुठल्या अधिकाऱ्याने तळमळीने पुणे शहरासाठी निस्पृहपणे काम केलेले आहे किंवा करत आहे आणि कोण नुसतीच तोंडाची वाफ दवडतो आहे याची जाण पुणेकरांना पुरेपूर आहे. पुणे शहरांसाठी चांगल्या उचललेल्या पावलांचे ते स्वागतच करतील, ही खात्री या महाज्ञानी महोदयांनी त्यांच्या मनात अवश्य बाळगावी हा त्यांना आम्हा सगळ्यांचा मोफतचा सल्ला, असा खोचक टोलाही महापालिका आयुक्तांनी पोस्टमध्ये लगावला आहे. पोस्टच्या शेवटी सर्व खाते प्रमुख पुणे महानगरपालिका, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT