Pune News: पुणे शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तातडीची बाब प्रशासनाच्या विविध विभागांनी ५०० वॉर्डन घेण्यासाठी तातडीने मान्यता दिली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिले. २२५ वॉर्डनची नियुक्तीही पूर्ण झाली आहे. मात्र, या ठेकेदाराबाबत तक्रार आल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी यू-टर्न घेत या ठेकेदाराच्या कामाला स्थगिती देऊन या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेकडे वॉर्डनची मागणी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू केली होती. पण काही दिवसांपूर्वी कात्रज कोंढवा रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. त्यावेळी निविदेत वेळ वाया न जाऊ देता ‘६७ ३ क’ या नियमानुसार विनानिविदा तातडीची बाब म्हणून मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला ५०० वॉर्डन पुरविण्याचे सुमारे १८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात चुकीचे काम केल्याबद्दल मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्याचा शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर वॉर्डन पुरविण्याचे काम देण्यात आले होते. काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देण्यात आले असे आरोप, तसेच ‘६७ ३ क’ या कलमाचा गैरवापर करून वर्षभरासाठी निविदा दिली.
या ठेकेदाराकडे आवश्यक परवाने नाहीत असाही आरोप सोशल मीडियातून करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त राम यांनी या निविदेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील लेखी अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत जयशंकर असोसिएट ठेकेदाराकडून काम करून घेऊ नये अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेशात नमूद केले आहे.
ठेकेदाराला वर्कऑर्डर दिल्यानंतर वॉर्डनची भरती सुरू झाली आहे. आतापर्यंत २२५ जणांची नियुक्ती झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात १२० जणांनी विविध ठिकाणी पोलिसांना मदत केली आहे. मात्र, आता चौकशीच्या फेऱ्यात ही निविदा अडकल्याने ज्यांची नियुक्ती झाली त्या वॉर्डनचे काय होणार? त्यांना पगार मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.