PMC Accepted Corporators Applications Sarkarnama
पुणे

PMC News: स्वीकृत नगरसेवक पदासाठी आता ‘फायनल गेम’ सुरू; 225 इच्छुक, जागा फक्त 45!

PMC Corporators: पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या ४५ जागांसाठी २९८ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून २२५ अर्जदार पात्र ठरले आहेत. आता अंतिम निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sudesh Mitkar

PMC Corporators News : महापालिकेच्या प्रभाग समित्यांमधील स्वीकृत नगरसेवकांच्या ४५ जागांसाठी तब्बल २२५ अर्जदार पात्र ठरले आहेत. प्रशासनाने प्राप्त झालेल्या २९८ अर्जांची छाननी पूर्ण करून पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या २२५ जणांमधून अंतिम ४५ नावांची निवड कोणाची होते, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पात्र यादी जाहीर होताच स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय पातळीवर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाने स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. प्रशासनाकडे एकूण २९८ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर त्यापैकी २२५ अर्जदार पात्र, तर उर्वरित अर्ज अपात्र ठरले आहेत.

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी यंदा प्रशासनाने पात्रतेच्या अटी अधिक कडक केल्या आहेत. सामाजिक आणि स्वयंसेवी क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींना संधी मिळावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, कडक अटी असूनही तब्बल २९८ अर्ज दाखल झाल्याने या पदासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील इच्छुकांची मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता खरी उत्सुकता अंतिम ४५ नावांची आहे. पात्र ठरलेल्या २२५ अर्जदारांमधून कोणाची निवड केली जाते, यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. यापूर्वी स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीत राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावली जात असल्याची टीका होत आली आहे. त्यामुळे प्रशासनाने यंदा घातलेल्या अटी आणि प्रत्यक्ष निवड प्रक्रिया यामध्ये किती सुसंगतता राहते, याकडेही लक्ष लागले आहे.

अर्जांच्या संख्येत हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर असून, येथे सर्वाधिक २८ अर्ज दाखल झाले. त्यापाठोपाठ विश्रामबागवाडा २७, वारजे-कर्वेनगर २६ आणि धनकवडी २४ अर्ज दाखल झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या संख्येतही हडपसर-मुंढवा आघाडीवर असून, येथे २४ अर्जदार पात्र ठरले आहेत.

धनकवडी-सहकारनगर-आंबेगाव येथे २२, सिंहगड रस्ता येथे २०, तर कोंढवा-येवले, कोथरूड-बावधन आणि वारजे-कर्वेनगर येथे प्रत्येकी १९ अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांतून आपापल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी श्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे.

अंतिम ४५ नावांवर कोणाची मोहोर?

​स्वीकृत नगरसेवकपदावर बहुतांश वेळा राजकीय कार्यकर्त्यांचीच वर्णी लावली जाते, असा आजवरचा इतिहास आहे. अनेकदा सामाजिक कार्याचे प्रमाणपत्र किंवा विविध संघटनांचे शिफारसपत्र जोडून हे पद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

​यंदा प्रशासनाने छाननी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी २२५ पात्र उमेदवारांमधून अंतिम ४५ नावांची निवड करताना पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक समीकरणेच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या ४५ जागांवर कोणाची लॉटरी लागते, याकडे संपूर्ण पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT