PMC BJP Protest  Sarkarnama
पुणे

Pune News: ...अखेर महापालिका प्रशासनानं फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर चालवला बुलडोझर, सत्ताधारी भाजप नगरसेवकांना करावं लागलं आंदोलन

Pune Enchroachment Action : पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरांतील प्रमुख रस्ता असलेल्या गोखले रोडवरील (फर्ग्युसन रस्ता) अतिक्रमणांवर मंगळवार (ता.17 नोव्हेंबर) पासून कारवाई सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं.

ब्रिजमोहन पाटील

Pune News: पुणे महापालिकेनं अखेर फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल, हातगाड्या आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपसह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी फर्ग्युसन रोडवरील वाढत्या अतिक्रमणांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर अखेर महापालिका प्रशासनानं फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर हटवण्यास सुरुवात केली आहे.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरांतील प्रमुख रस्ता असलेल्या गोखले रोडवरील (फर्ग्युसन रस्ता) अतिक्रमणांवर मंगळवार (ता.17 नोव्हेंबर) पासून कारवाई सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यापूर्वी भाजपच्याच नगरसेवकांनी पुण्यातील गोखले रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केलं होतं. या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर प्रतीकात्मक कपड्यांचे दुकान मांडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता.

पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता असतानाही त्यांच्याच नगरसेवकांना आंदोलन करावं लागत असल्यानं विरोधकांनी आंदोलक नगरसेवकांची खिल्ली उडविली.मात्र, महापौर मंजुषा नागपुरे यांनी भाजप नगरसेवकांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला. यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "लोकप्रतिनिधी वारंवार तक्रारी घेऊन अधिकाऱ्यांकडे जातात. मात्र, अधिकारी कामे प्रलंबित ठेवतात. ही कार्यपद्धती संशोधनाचा विषय आहे. दोन महिन्यांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथ, बाजूची मोकळी जागा, इमारतींचे पुढील क्षेत्र आणि गोदामांमधील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतरही कारवाई का झाली नाही? निष्काळजी कर्मचाऱ्यांना निलंबित करा. काम करायचे नसेल तर महापालिकेत राहण्याची आवश्यकता नाही."

यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनीही अतिक्रमणांवरील कारवाई होत नसल्याबद्दल प्रशासनातील त्रुटी मान्य केल्या. ते म्हणाले, "अतिक्रमणविरोधी कारवाई करताना प्रशासनाकडूनही काही चुका झाल्या असतील, तर त्यात सुधारणा केली जाईल. केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाईल. आजपासून गोखले रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाईल. वाहतूक, पार्किंग आणि विक्रेत्यांच्या वेळांचे नियोजन करून लवकरच विशेष कृती कार्यक्रम राबविला जाईल."

पुण्यातील गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याच्या (फर्ग्युसन रस्ता) दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, पदपथांवरून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक नाही. मध्यरात्रीपर्यंत अनधिकृत व्यवसाय सुरू असतात. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी नियुक्त असूनही त्यांच्या डोळ्यांदेखत हे व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यात नगरसेवक रवींद्र साळेगावकर, अपूर्व खाडे, सुनील पांडे, नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे आणि पूजा जागडे यांनी आंदोलन केले. भाजपच्या अन्य नगरसेवकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

नगरसेवक धीरज घाटे यांनी रस्त्यावरील विक्रेते बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप केला. त्यावर काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला. अतिक्रमणाच्या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत असून, या आरोपांचे पुरावे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. त्यावर काँग्रेस आणि बांगलादेशी घुसखोरांचे नाते आहेच, असे प्रत्युत्तर घाटे यांनी दिले. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT