Congress leaders felicitate Prashant Jagtap in Pune amid growing tensions within the MVA before Pune Municipal Corporation elections. Sarkarnama
पुणे

NCP Vs Congress : "आम्ही शरद पवारांच्या माणसाला घेऊ शकतो अन् त्याला सन्मानही देऊ शकतो" : पुण्यात एका काँग्रेस नेत्याच्या उद्योगाने आघाडीला सुरूंग

NCP Vs Congress : पुण्यात प्रशांत जगताप यांचा काँग्रेसकडून झालेला जंगी प्रवेश राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिव्हारी लागला असून, पुणे महापालिका निवडणुकीआधीच महाविकास आघाडी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hrishikesh Nalagune

NCP Alliance : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार... दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत जाणार... महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम... अशा राजकीय घडामोडी सतत बदलत असताना रविवारी (28 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आघाडीला सोडचिठ्ठी देत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.

आता आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या 3 पक्षांची आघाडी, दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फिस्कटलेली चर्चा पुन्हा कशी यशस्वी झाली? नेमका काय तोडगा निघाला? आणि जागावाटप जाहीर झालेल्या आघाडीत बिघाडी का झाली? असे सवाल विचारले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या घडामोडींमागे काँग्रेसच्या एका नेत्याने केलेले उद्योग कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये जागावाटप करताना एकमेकांच्या पक्षातील इच्छुकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घेण्यास काँग्रेसमध्ये एका नेत्याचा सुरुवातीपासूनच विरोध होता. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून बाहेर पडलेल्या प्रशांत जगताप यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात आला. तिथूनच महाविकास आघाडीत पहिली वादाची ठिणगी पडली.

पुण्यात काँग्रेस विरुद्ध शरद पवार हे फार जुने समीकरण आहे. अशात काँग्रेसने आघाडीचा नियम मोडून प्रशांत जगताप यांना पक्षात वाजतगाजत प्रवेश दिला. त्यानंतर पुण्यात काँग्रेसभवन येथे जंगी स्वागत, सत्कार केले. आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना शहर पातळीवरील काँग्रेस नेत्यांना बैठक सोडून स्वागतासाठी येण्यासाठी आग्रह धरला गेला. काँग्रेसच्या एका नेत्याने या सगळ्या गोष्टी आघाडीत बिघाडी व्हावी यासाठी जाणीवपूर्वक केल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने केला.

शरद पवार यांना जाहीरपणे विरोध करणाऱ्या त्यांच्याच माणसाला आम्ही काँग्रेसमध्ये घेऊ शकतो, त्याला ताकदही देऊ शकतो हे काँग्रेसला दाखवून द्यायचे होते. हे डिवचणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने प्रचंड जिव्हारी लागले. अशा काँग्रेससोबत जाण्यापेक्षा आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जाऊ. यातूनच रविवारी संध्याकाळी पुन्हा सूत्र फिरली आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असेही पक्षातील नेत्याने नाव न देण्याच्या बोलीवर सांगितले.

रविवारी संध्याकाळी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यामध्ये जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्या. त्यासाठी पक्षाचे प्रभारी आणि आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे नेते सचिन अहीर यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट न पाहता शिवसेनेसोबत एकत्रित निवडणुका रिंगणात उतरण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT