Pune Encroachment Drive | PMC Action | March 2027 Sarkarnama
पुणे

PMC Action : मंत्र्यांनंतर आता नगरसेवकांच्या निकटवर्तीयांचा नंबर; 'फोनाफोनी'ला न जुमानता आयुक्तांच्या कारवाईचा बुलडोजर थेट 2027 पर्यंत

Pune Encroachment Drive : महापालिकेत नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. कारवाईसाठी हप्तेखोरी होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. प्रशासनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले.

Sudesh Mitkar

Pune News, 24 Nov : शहरातील अतिक्रमणांवरून सभागृहात प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्याच वर्तुळात आता महापालिकेच्या कारवाईचा बुलडोजर पोहोचला आहे. राजकीय दबाव आणि 'फोनाफोनी'ला न जुमानता प्रशासनाने सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही हातोडा चालवला आहे. ही अतिक्रमण हटाव मोहीम केवळ तात्पुरती नसून, ती थेट मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याचा कडक इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांसह राजकीय वर्तुळाचेही धाबे दणाणले आहेत.

नेमके प्रकरण काय?

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. कारवाईसाठी हप्तेखोरी होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. प्रशासनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले.

या मोहिमेअंतर्गत सोमवारी वृद्धेश्वर घाट येथील अनधिकृत हॉटेलसह वडगाव फाटा, जेम कॉर्नर आणि कोथरूड परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. विशेष म्हणजे, यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांचाही समावेश होता. यापूर्वी कोथरूडमध्ये एका मंत्र्याच्या नातेवाइकाचे अतिक्रमणही हटविण्यात आले होते. ही कारवाई थांबवण्यासाठी जोरदार फोनाफोनी झाल्याची चर्चा होती, मात्र प्रशासनाने कोणतीही माघार घेतली नाही.

यापूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनेही नगरसेवकांच्या कार्यालयांमध्येच कथित अनधिकृत बांधकामे असल्याचा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांना निवेदन दिले होते. सर्वसामान्यांवर कारवाई होत असताना लोकप्रतिनिधींशी संबंधित अतिक्रमणांना हात लावणार का, असा सवाल त्यातून विचारला गेला होता. आता प्रशासनाने थेट नगरसेवकांशी संबंधित अतिक्रमणांवरच कारवाई सुरू केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मार्च २०२७ पर्यंत 'नॉन-स्टॉप' कारवाई

शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून प्रमुख रस्ते, चौक, पदपथ आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यावर भर दिला जात आहे. अतिक्रमणांविरोधातील कारवाई मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतरही गरजेनुसार कारवाई केली जाईल.

अतिक्रमण करणारा सर्वसामान्य व्यावसायिक असो किंवा राजकीय व्यक्तीशी संबंधित, कोणाचीही गय केली जाणार नाही. कोणताही दबाव किंवा हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली जाईल, असं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. पुढील चार महिन्यांत ही कारवाई अधिक तीव्र होणार असून, अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केल्यास संबंधितांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT