

Kolhapur News, 24 Nov : कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती सरकारने चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली होती. या नियुक्तींना न्यायालयात आव्हान दिल्यानंतर राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली. या खटल्यासाठी रोहतगी यांना तब्बल ८० लाख रुपये मानधन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी?" असा सवाल त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या पोस्टच्या शेवटी सतेज पाटील यांनी 'लक्षात ठेवलंय २०२९' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुती सरकारने घेतलेली भूमिका आणि त्यासाठी खर्च करण्यात आलेले ८० लाख रुपये सतेज पाटील यांनी लक्षात ठेवल्याचा सूचक संदेश या माध्यमातून दिला आहे.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत या मुद्द्याचा राजकीय हिशेब चुकता केला जाईल, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिल्याची चर्चा आहे. गोकुळच्या निवडणुकीतील सत्तासंघर्ष आता न्यायालयीन लढाईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद आगामी राजकारणातही उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतेज पाटलांचा 'लक्षात ठेवलंय २०२९' हा इशारा महायुतीसाठी नेमका किती महत्त्वाचा ठरणार, हे पाहावं लागेल.
हटके टॅगलाईनसाठी पाटील प्रसिद्ध
काँग्रेस आमदार सतेज पाटील हे त्यांच्या हटके टॅगलाईनसाठी ओळखले जातात. 2019 मध्ये त्यांनी ठरवून आघाडीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. त्यावेळी तत्कालिन शिवसेनेचे संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार असूनही सतेज पाटील यांनी जुना राजकीय वचपा काढण्यासाठी 'आमचं ठरलंय' म्हणत राज्यस्तरावरील नेत्यांना न जुमानता स्वतःची यंत्रणा वापरून संजय मंडलिक यांना विजयी केले होते.
'आमचं ठरलंय' ही टॅगलाईन कोल्हापूरसह राज्यभरात पोहोचली. त्यानंतर राजाराम कारखान्यातही 'कंडका पाडायचा' ही टॅगलाईन चांगली चर्चेचा विषय ठरला होती. अशातच आता पाटील यांनी लक्षात ठेवलंय २०२९ असं म्हटल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ते या टॅगलाईनवर काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.