Pune News, 08 Nov : महापालिका हद्दीत ३२ गावांचा समावेश झाल्यानंतर प्रशासनाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचा ताण सध्याच्या मुख्यालयावर पडू लागला आहे. वाढती लोकसंख्या, कर्मचारी संख्या आणि प्रशासकीय कामकाजाची गरज लक्षात घेऊन शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर महापालिकेची स्वतंत्र आणि अत्याधुनिक प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी सुमारे अडीच एकर जागेचा विचार सुरू असून, नव्या प्रशासकीय केंद्राचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.
महापालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली. त्यानंतर १९६६ मध्ये सध्याच्या मुख्यालयाची इमारत उभारण्यात आली. वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन २०१५ मध्ये लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र इमारतीचे काम सुरू करण्यात आले. ही इमारत २०१८ मध्ये कार्यान्वित झाली. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांची व्यवस्था झाली; मात्र प्रशासनासाठी जागेची कमतरता कायम राहिली आहे.
कर आकारणी व कर संकलन, शिक्षण मंडळ, स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि आरोग्य विभागासह महापालिकेच्या अनेक विभागांचे काम आजही वेगवेगळ्या इमारतींमधून सुरू आहे. त्यामुळे बैठका, प्रशासकीय कामकाज आणि दैनंदिन समन्वयासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागते. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नव्या प्रशासकीय इमारतीची संकल्पना मांडली आहे.
शिवाजीनगरमधील शिवाजी आखाड्याची जागा नव्या प्रशासकीय केंद्रासाठी निश्चित करण्याबाबत विचार सुरू आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची असून, ती दीर्घकालीन भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. आखाडा बालवाडी परिसरात स्थलांतरित करण्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रस्तावाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात येत आहे.
एकाच इमारतीत सर्व विभाग आणण्याचे नियोजन
नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये महापालिकेचे विविध विभाग एकत्र आणण्याचे नियोजन आहे. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले विभाग एकाच ठिकाणी आल्यास प्रशासकीय समन्वय वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑनलाइन बैठक कक्ष, विविध समित्यांसाठी प्रशस्त सभागृहे तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि कामांसाठी स्वतंत्र सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. नागरिकांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत आणि प्रशासकीय कामकाजाला गती मिळावी, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रस्ताव अद्याप प्राथमिक टप्प्यात
शिवाजी आखाड्याचे बालवाडी येथे स्थलांतर, संबंधित जागेचा ताबा, नव्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा आणि निधीची तरतूद या बाबींवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. प्रस्तावाचे सविस्तर सादरीकरण पदाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला अंतिम स्वरूप मिळणार आहे. त्यामुळे शिवाजी आखाड्याच्या जागेवर महापालिकेचे नवे प्रशासकीय केंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात कधी येणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचे नियोजन - गणेश बिडकर
पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, महापालिकेची सध्याची प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजांचा विचार करून नवीन प्रशासकीय इमारत उभारणे आवश्यक आहे. ही इमारत पूर्णपणे ‘ग्रीन बिल्डिंग’ स्वरूपाची असणार आहे. प्रत्येक मजल्यावर एक संपूर्ण प्रशासकीय विभाग कार्यरत असेल, अशा पद्धतीने तिचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
कॉर्पोरेट पद्धतीने सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित जागा सध्याच्या महापालिका मुख्यालयापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असल्याने प्रशासकीय समन्वयाच्या दृष्टीनेही ती सोयीची ठरणार आहे. पुढील चार वर्षांत या संपूर्ण इमारतीचे काम पूर्ण करून ती नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.