

Anti Corruption Bureau action : शिक्षिकेकडे वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी 50 हजार रुपयांची लाच मागणून ती स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली आहे.
संजय दगडू राणे (वय 55, रा. घारगाव, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. शिक्षण संस्थेचा अध्यक्ष श्रीप्रकाश चांदमल बोरा (रा. आणे, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्याविरोधात देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संगमनेरच्या (Sangamner) घारगाव पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या लाचेच्या प्रकाराने शिक्षण क्षेत्रातील काळ्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक संजय राणेविरोधात कारवाई होत असल्याची भनक संस्था चालक श्रीप्रकाश बोरा याला लागताच तो पसार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार शिक्षिकेची (Teacher) 15 वर्षे सेवा पूर्ण झाली असून, त्यांनी त्यांच्या सेवेत 12 वर्षे पूर्ण झाल्याचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण 2024-25 मध्ये पूर्ण करून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेकडे जमा केले होते. परंतु शिक्षिकेला वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला नसल्याने त्यांनी जून 2026मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी मुख्याध्यापक संजय राणे यांच्याकडे अर्ज दिला.
या अर्जावर कार्यवाहीसाठी मुख्याध्यापक राणे यांनी शिक्षिकेला वरिष्ठ वेतनश्रेणीच्या लाभाचा ठराव मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात संस्थेचे अध्यक्ष बोरा याने 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे सांगितले. त्याबाबत शिक्षिकेने संस्था चालक बोरा याची आणे येथे जाऊन भेट घेतली. बोरा याने ठराव पाठवण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम मुख्याध्यापकाकडे जमा करण्यास सांगितली.
शिक्षिकेने यासंदर्भात लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. पथकाने शिक्षिकेच्या तक्रारीची पडताळणी केली. घारगाव येथील शाळेमध्येच मुख्याध्यापकांनी तक्रारदार शिक्षकेकडून 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम पंच साक्षीदारांसमोर स्वीकारली. पथकाने कारवाई करत मुख्याध्यापक राणे याला ताब्यात घेतले. घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
ही रक्कम संस्थाचालक बोरा याने सांगितल्यावरून, मुख्याध्यापक राणे याने ही रक्कम स्वीकारल्याचे मोबाईलवरील संपर्कावरून समोर आले आहे. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियामानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्येच भ्रष्टाचाराचे प्रकार घडत असतील, तर शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.