Pune News: पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागील आठवड्यात झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या कथित 'राड्या'च्या निषेधार्थ आज विरोधी पक्षांनी महापालिकेत आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी खांद्याला काळ्या पट्ट्या बांधून महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. नंतर या नगरसेवकांनी डोक्यावर चक्क 'सेफ्टी हेल्मेट' घालून सभागृहात प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
नेमकं प्रकरण काय?
मागील आठवड्यात बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पुणे शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा सुरू होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण हे आपले मत मांडत होते. भाषण करताना पठाण यांनी बोपोडी येथील दर्गा महापालिकेच्या वतीने पाडण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावरून सभागृहातील वातावरण अचानक तापले. भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आणि ते थेट गफूर पठाण यांच्या दिशेने धावून गेल्याची घटना घडली.
या प्रकारामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. वाद हाताबाहेर जात असल्याचे पाहून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला, ज्याला महापौर मंजुषा नागपुरे यांनी तात्काळ मंजुरी दिली होती.
भाजप नगरसेवकांपासून संरक्षण द्या!
मागील सभेतील या घटनेचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस नगरसेवकांनी अनोखे आणि उपहासात्मक आंदोलन केले. "भाजपचे नगरसेवक थेट अंगावर धावून येतात, त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे, यासाठी आम्ही हे सेफ्टी हेल्मेट घातले आहे," अशी खोचक टीका काँग्रेस नगरसेवकांनी केली. डोक्यावर हेल्मेट घालूनच काँग्रेसचे नगरसेवक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात सहभागी झाले होते. भाजपच्या 'दडपशाही' आणि आक्रमकतेचा निषेध करण्याचा हा आमचा मार्ग असल्याचे आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.