

Chhatrapati Sambhajingar Municipal Corporation News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे त्यांच्या नगरसेवकांसाठी हिरो आहेत. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी शहरातील कचरा संकलन केंद्राला विरोध करताना एका अधिकाऱ्याला धमकावताना महापौर, आमदार, खासदार कुणीही असो, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाविना जुन्या शहरात काम करता येणार नाही, असे विधान केले होते.
यावरून महापौरांचा अपमान केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांनी सर्वसाधारण सभेत इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांचा उल्लेख 'शक्ती कपूर' असा केला आणि एकच गोंधळ उडाला. अफसर खान यांच्या या विधानावर एमआयएमचे नगरसेवक संतापले आणि त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी अफसर खान यांची बाजू घेत एमआयएमच्या नगरसेवकांना डिवचले.
महापालिकेत भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतरची दुसरी सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या वेळीही सत्ताधारी भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये अनेक मुद्यांवरून भडका उडाल्याचे पहायला मिळाले. तब्बल साडेपाच वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर महापालिकेची निवडणूक झाली. आतातरी आपले प्रश्न सुटतील, या अपेक्षेने जनतेने नगरसेवक निवडून दिले, पण ज्या सभागृहात विकासाचे प्रश्न मांडायचे तिथे प्रत्येक सभेत राजकारणावरच बहुतांश वेळ वाया जात आहे.
'आमच्यासाठी फक्त इम्तिजायज जलीलच महापौर, आमदार-खासदार आहेत'या विरोधीपक्षनेच्या वक्तव्यावरून सुमारे पाऊण तास सर्वसाधारण सभेत खल करण्यात आला. शेवटी महापौरांनी शहरातील लोकप्रतिनिधी, महापौर यांचा अवमान होईल, असे वक्तव्य करू नका, अशी विनंती करून विषय संपविला. त्यासोबतच नामकरणाच्या विषयावरही राजकारण जोमात होते.
सभेला सुरवात होताच पहिल्याच विषयापासून राजकारण रंगले. वंचित बहुजन आघाडीचे गटनेचे अफसर खान यांनी 'शहरात महापौर, आमदार, खासदार कुणीही असो, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाविना जुन्या शहरात काम करता येणार नाही' या विरोधी पक्षनेता अब्दुल समीर साजिद यांच्या डायलाॅगचा समाचार घेतला. इम्तियाज यांचा उल्लेख शक्ती कपूर असा करत लोकप्रतिनिधी, महापौरांचा अपमान सहन केला जाणार नाही, कुणाचीही दादागिरी चालणार नाही, असा इशारा दिला.
त्यावर एमआयएम नगरसेवक आक्रमक झाले. सभागृहात गोंधळ उडताच महापौरांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेत्याने माफी मागावी, अशी मागणी राजगौरव वानखेडे यांनी केली. लोकप्रतिनिधींबद्दल बोलताना भान ठेवा, कुणाचा अपमान होईल, असे वक्तव्य यापुढे कोणी करू नये, अशी विनंती करत महापौरांनी असंसदीय शब्द इतिवृत्तांतून काढून टाकण्याचे आदेश देत वातावरण शांत केले.
कारवाई करा
एमआयएमच्या नगरसेवकांना त्यांच्या नेत्यांचा केलेला अपमान चालत नाही, मग दुसऱ्याविषयी अपमानास्पद का बोलतात? असा प्रश्न प्रमोद राठोड यांनी केला. एमआयएमच्या काही नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, मग आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही. ती कारवाई चुकीची असेल तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी राठोड यांनी लावून धरली.
सभेत जंजाळ यांनी महापौरपदाला मोठा मान आहे. या पदाची गरिमा पाळली पाहिजे, असे हे सांगत, विरोधी पक्षनेत्यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. त्यांना समज द्या. गरज पडल्यास प्रशिक्षण वर्ग घ्या, अशी सूचना मांडली. विरोधीपक्षनेत्याने आता आयुक्तांकडे कामे घेऊन जाऊ नये, त्यांच्या नेत्याकडे जावे, असा टोला जंजाळ यांनी लगावला. त्यावर एमआयएम नगरसेवक पुन्हा आक्रमक झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.