PMC Pune Sarkarnama
पुणे

पुणे पालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष ठरणार ‘श्रीयाळशेठ’?

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्यांची दोन वर्षाची मुदत एक मार्च रोजी संपणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या (pmc standing committee) आठ सदस्यांची मुदत येत्या एक मार्चला संपत आहे.रिक्त होणाऱ्या या जागांसाठी निवडणूक घ्यावी लागेल, असा अभिप्राय पालिकेच्या विधी विभागाने दिला आहे.नव्याने आठ सदस्यांची निवड झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक घेण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. महापालिकेची पाच वर्षांची मुदत १४ मार्च रोजी संपणार असल्याने नव्याने निवड होणारे सदस्य व स्थायीचे अध्यक्ष म्हणजे औटघटकेचा राजा ‘‘श्रीयाळशेठ’ ठरण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्यांची दोन वर्षाची मुदत एक मार्च रोजी संपणार आहे. महापालिकेच्या सर्व नगरसेवकांची मुदत १४ मार्चला संपणार आहे. एक मार्च १४ मार्च या काळात या कालावधीत स्थायी समितीचे कामकाज पाहण्यासाठी नव्याने सदस्य नियुक्त करावेत की सध्याच्या समितीस मुदतवाढ मिळू शकते याबाबत महापालिका प्रशासनाने राज्य सरकारसहीत महापालिकेच्या विधी विभागाकडे अभिप्राय मागविला होता.महापालिकेच्या विधी विभागाचा अभिप्राय नगरसचिव विभागाला मिळाला असून, त्यामध्ये निवडणूक घेणे आवश्‍यक आहे, असे स्पष्ट केले आहे.

स्थायी समितीच्या १६ पैकी ८ सदस्यांची मुदत एक मार्च रोजी संपणार आहे. या जागांवर नव्या आठ सदस्यांची निवड करण्यासाठी तीन दिवस आधी सूचना काढून खास सभा बोलवावी लागते. त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडून सदस्यांची नावे देऊन त्यांची निवड केली जाईल. सदस्य निवडीनंतर अध्यक्षांची निवडणूकही घ्यावी लागेल. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांची वेळ घेणे आवश्‍यक असते. पीठासीन अधिकाऱ्याने वेळ दिल्यानंतर स्थायी अध्यक्षांची निवडणूक घेतली जाते.त्यामुळे निवडणूक झालीच तर स्थायी समिती अध्यक्ष औटघटकेचे शिराळशेठ ठरणार आहेत.

स्थायी समितीमधील भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवकाची मुदत संपणार आहे. यामध्ये भाजपच्या वर्षा तापकीर, सुनीता गलांडे, उज्वला जंगले, मानसी देशापांडे, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, अमृता बाबर, शिवसेनेचे बाळा ओसवाल आणि काँग्रेसच्या लता राजगुरू यांचा समावेश आहे. १ मार्च ते १४ मार्च या चौदा दिवसांसाठी याच सदस्यांना पुन्हा संधी मिळणार की नवे सदस्य येणार याकडे लक्ष लागले आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT