Pune News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी आता पुन्हा एकदा जोर लावला आहे. अशातच राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडून मोठी पावलं उचलली जात असतानाच पुण्यात भाजपकडून सोयीस्कररित्या प्रभाग रचना केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याचदरम्यान,आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC) प्रभाग रचना शुक्रवारी(ता.22) जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली आहे. मनपा आयुक्तांनी प्रभाग रचना जाहीर करताना पुणे महानगरपालिका निवडणूक 2025 असा उल्लेख केला आहे.
तसेच पुणे महानगरपालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेत(Ward 4 नगरसेवकांचे 40 प्रभाग (मतदारसंख्या 84,000 मतदार), तर 5 नगरसेवकांचे 1 प्रभाग (मतदारसंख्या 1,05000)अशी रचना असणार आहे. प्रभाग क्रमांक 38 हा 5 सदस्यांचा असेल. नागरिकांना हरकती घेण्यासाठी 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 पर्यंत मुदत राहणार आहे.
काही दिवसांपासूनच पुणे महापालिका प्रशासनाने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्तानी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत आढावाही घेतला होता.यात मतदार केंद्र, निवडणूक अधिकारी कार्यालयांसाठी जागा शोधण्यापासून ते निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी शासनाच्या विविध विभागांशी याबाबत संपर्क साधण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेचा प्रभाग रचनेच्या (Ward Structure) प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत स्थानिक स्वराज संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आदींचा समावेश आहे.
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्यात आल्याचं सांगितलं होतं. सोमवारी त्याचा प्रारुप आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच 2025 मध्येही चार सदस्यांचा प्रभाग असण्याचे संकेत मिळाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रभाग रचना व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होत असताना या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी भाजप हस्तक्षेप करत असून त्यासाठी प्रशासनातील नेते त्यांना मदत करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपल्या पक्षासाठी सोयीचे ठरतील अशा प्रभागांची रचना करणे, राजकीय फायद्यासाठी शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रवृत्त करणे अशा अनेक मार्गाने भाजप सक्रिय झाला आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकारात पुणे महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनातील काही घटकांचे सत्ताधाऱ्यांना सहकार्य मिळत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.
याबाबत महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली होती. यावेळी प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भाजपचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.
2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामुळे पुण्यात प्रभाग संख्या 42 राहणार असून, नगरसेवकांची संख्या 165 राहणार आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महापालिकेची मुदत संपली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना एक, दोन आणि तीनची होणार यावर अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती. या निवडणुकीसाठी आता चार सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेवरील वर्चस्वासाठी महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांंच्या राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये जोरदार मोर्चेबांंधणी सुरू केली आहे. पण आता जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेत पुण्याचे पालकमंत्री अजितदादा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वरचष्मा आहे, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.