
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील प्रचंड मोठ्या यशानंतर बारा हत्तींचं बळ आलेल्या महायुती सरकारमधील मित्रपक्षांमध्ये पहिल्या दिवसांपासूनच खटके उडत असल्याचं लपून राहिलेलं नाही. मंत्रिपदं, खातेवाटप,पालकमंत्रिपदावरुन जोरदार घमासान अनुभवलेल्या महायुतीत आता कुरघोडीचं राजकारण सुसाटपणे सुरू आहे. यातच भाजपनं राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांच्या (Ganesh Naik) खांद्यावर बंदूक ठेवून थेट एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या 'ठाण्या'वरच निशाणा लावल्याचं दिसून येत आहे. नाईकांनीही मग शिंदेंसह शिवसेनेवर टीकेच्या तोफा डागण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईसह राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबईतील दहीहंडीच्या उत्सवात यंदा नेहमीप्रमाणे शिवसेनेनं चांगलाच जोर लावल्याचं पाहायला मिळालं. यातच काही दिवसांपासून मंत्री गणेश नाईकांनी शिंदेंविरोधात म्यान केलेल्या तलवारीला पुन्हा धार देत ठाण्यातलं राजकीय वातावरण तापवल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान, शिंदेंनी गणेश नाईकांच्या टीकेला 'करारा जवाब' देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच दहीहंडीच्या उत्सवात एका स्टेजवर आणत मोठी खेळी खेळली. पण यानंतरही गणेश नाईकांनी शिंदेंना घायाळ करणारे एकापाठोपाठ एकबाण सोडणं सुरुच ठेवलं आहे.
दहीहंडीच्या उत्सवासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी CM फडणवीसांना ठाण्यात आणत महायुतीतील एकीची साक्ष देण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. पण या शिंदेंच्या या खेळीला आठवडा उलटत नाही,तोच गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या शिवसेनेला दोनदा डिवचलं आहे.
खरंतर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेजण दहीहंडीच्या निमित्तानं ठाण्यातील टेंभीनाका परिसरात एकत्रित आले होते.यावेळी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना एकच असल्याचे सांगत एकोप्याचे दर्शनही घडवलं होतं.यानंतर तरी ठाण्यातील भाजपच्या गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेली गटबाजी थांबण्याची शक्यता फोल ठरल्याचेच दिसून येत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक यांनी मुंबईतील महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत जनता दरबारची मोहीम सुरूच ठेवली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाणे दौऱ्यानंतरही नाईकांनी महायुतीतील एकोप्याच्या संदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचंच सध्यातरी दिसत आहे.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले आहेत.नवी मुंबई म्हणजे नाईक आणि ठाणे म्हटलं की शिंदे असं समीकरण वर्षानुवर्षे पाहायला मिळालं होतं. पण एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईत लक्ष घातल्यानंतर नाईकांनी शिंदेंच्या ठाण्याकडे मोर्चा वळवला. आणि हीच नाईक विरुद्ध शिंदे वादाची पहिली ठिणगी ठरली.
यानंतर गणेश नाईकांनी थेट ठाण्यात भाजपच नंबरचा एक पक्ष असल्याचा दावा केल्यामुळे शिंदेंसह शिवसेनेची तळपायाची आग मस्तकात जाण्याची शक्यता आहे.वनमंत्री गणेश नाईक यांनी भाजप भविष्यात एक नंबरचा पक्ष राहणार असल्याचं मोठं विधान करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाणे,नवी मुंबई, डोंबिवली, पालघर, उल्हासनगरची जिल्हा परिषद भाजपकडे राहील,असा विश्वासही व्यक्त केला आहे.
भाजपच्या गणेश नाईकांच्या विधानामुळे पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कुरघोडीचा प्रयत्न तर केला नाही ना,अशी चर्चा महायुतीसह राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे. भविष्यकाळात मित्रपक्षांचा सन्मान राखून भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष होईल, असंही नाईक यांनी म्हटलं आहे.
भाजप मंत्री गणेश नाईक यांनी पालघरमधील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंबाबत बोलताना लॉटरी लागली, असे वक्तव्य केलं होतं. नाईकांनी शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेले टिकवता आलं पाहिजे. किती कमावले यापेक्षा, ते कसं कमावलं आणि कसं टिकवलं, याकडे जनसामन्यांची नजर असते,असं विधान केलं होतं. त्यामुळे खवळलेल्या शिवसेनेकडून भाजपचे नाईक यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला होता.
खासदार नरेश म्हस्के यांनी साठी बुद्धी नाठी. गणेश नाईक यांचं वय झालं आहे, त्यामुळे कदाचित वयोवृद्ध झाल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत असावेत. एकनाथ शिंदे हे बाहेर पडले, त्यामुळे ही सत्ता मिळाली, त्यामुळे लॉटरी कोणाला लागली, हे तुम्ही समजून घ्या’ असा इशारा दिला आहे. तसेच, शिवसेनेचे नेते विजय चौघुले यांनी ‘मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते, तर गणेश नाईक यांचीच लॉटरी लागली नसती,’ असा टोला पालकमंत्रिपदावरून लगावला होता.
मुकेश अंबानींमुळे गणेश नाईक यांना पालकमंत्रिपद मिळालं, असा आरोप शिवसेनेच्या चौघुले यांनी केल्यानंतर त्यावर नाईकांनी ‘ठीक आहे, मी काय नाकारत नाही. पण सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मिळालं, असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे ठाण्यात सध्या सत्तेतील दोन पक्षांत वार-प्रतिवार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.