Pune Municipal Election 2026: ‘दुबार मतदार दिसला की त्याला तुडवा,’ असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीरसभेत सांगितले आहे. त्यानंतर दुबार मतदान टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील गावकऱ्यांनी आता पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांनी आपल्या गावातील मतदारांची नावे पुणे महापालिकेच्या निवडणूक यादीत आहे, अशा दुबार मतदाराच्या नावाचा फलक लावला आहे. या बॅनरबाजीमुळे संपूर्ण गावासह आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आज पुण्यात हे मतदार मतदानासाठी जातील, या पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा व परिसरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीच्या वतीने फ्लेक्स लावून दुबार मतदान केल्यास किंवा त्यासाठी वाघोली येथे गेल्यास “रडूस्तर चोप देऊन पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा थेट आणि सज्जड इशारा देण्यात आला आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांच्या मुख्य चौकात अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे. दुबार मतदान हा गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. अशा प्रकारात कोणीही सहभागी झाल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, असेही या फ्लेक्सवर म्हटले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कायद्याचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या बॅनरवर केले आहे.
या बँनरची चर्चा परिसरात आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासन व निवडणूक यंत्रणेने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. काही ठिकाणी संतप्त झालेल्या नागरिकांनी हे फ्लेक्स फाडून टाकल्याच्याही घटना घडल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेसाठी आज मतदान सुरु असताना शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे. वडगाव रासाई, इनामगाव, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी,तांदळी आदी गावांतील अनेक ग्रामस्थांची नावे पुणे महानगरपालिकेच्या मतदारयादीत आढळली आहेत.
मांडवगण फराटा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक मतदारांची नावे ग्रामपंचायत मतदारयादीत असतानाच वाघोली (पुणे महानगरपालिका) मतदारयादीतही नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे. फ्लेक्सवर केवळ २५ मतदारांचीच नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील बहुतांश मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत. तरीही त्यांची नावे महापालिकेच्या मतदारयादीत आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व नाराजी व्यक्त होत आहे. मोठ्या प्रमाणावर नावे असतानाही मोजक्याच व्यक्तींची नावे देऊन फ्लेक्स लावण्यात आल्याने संभ्रमासह संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.