Pune News, 21 Aug : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यभरामध्ये महायुतीचं भवितव्य काय? असेल याबाबत अनिश्चितता आहे. पुण्यात मात्र भाजपच्या स्थानिक नेते मंडळीने जवळपास स्वबळावर निवडणूक लढवायची हे आपल्या मनाशी ठरवून टाकलं आहे.
तसेच पुणे महापालिका निवडणुकीमध्ये खरं आव्हान हे महाविकास आघाडीतून नव्हे तर अजित पवारांचे असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कशा पद्धतीने खिंडीत पकडता येईल या पद्धतीने प्रभाग रचना बनवण्यात आल्याची चर्चा देखील सुरू आहे.
त्यामुळे वरवर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं दिसत असलं तरी आतमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त संघर्ष सुरू आहे का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या बाबत विरोधकांकडून देखील महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये सारं काही अलबेल नसल्याची टीका वारंवार करण्यात येत आहे.
अशातच विरोधकांच्या म्हणण्याला बळ देणारी गोष्ट काल पुण्यामध्ये घडली असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे उभारण्यात आलेल्या उद्घाटन पुलाचे देखील या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.
मात्र, अजित पवार आणि फडणवीस हे कार्यक्रमाला येण्यापूर्वी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमाच्या ठिकाणी एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उभे राहून जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगल्याच पाहायला मिळालं.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यामुळे उद्घाटन उड्डाण पुलाचे चर्चा मात्र भाजप राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडल्याचीच राजकीय वर्तुळात रंगली.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीने संघर्ष रंगू शकतो याचा ट्रेलर एक प्रकारे या उद्घाटनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही संघर्षाची सुरुवात असून जशी महापालिकेची निवडणूक जवळ येईल तसतसं हा संघर्ष आणखी गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.