AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute. Sarkarnama
पुणे

Pune Nivadnuk : पुण्यात महाविकास आघाडी फुटली! जागा वाटपाच्या घोषणेनंतर लगेचच पहिला धक्का; नाराज पक्षाकडून स्वबळाची घोषणा

Pune Nivadnuk : पुण्यात जागावाटप जाहीर होताच महाविकास आघाडीत फूट पडली असून, आम आदमी पक्षाने पुण्यासह राज्यातील महापालिकांत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune Mahapalika Nivadnuk : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला घोषित करताच अवघ्या तासाभरात महाविकास फुटली आहे. पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांत आम आदमी पक्ष (आप) महाविकास आघाडीसमवेत निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे लढणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. पक्ष पुण्यात 100 हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, असेही पक्षाने सांगितले आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुणे महापालिकेच्या जागा वाटपावर शनिवारी सकाळी शिक्कामोर्तब केले. यात काँग्रेस 50, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 50 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 50 जागा लढविणार असल्याचे घोषित करण्यात आले. याशिवाय आप, वंचित, रासप या तिन्ही पक्षांना 12 ते 15 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर ‘आप’ने भूमिका जाहीर केली आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुमारे 4 वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी तसेच त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभेसाठीही ‘आप’ने महाविकास आघाडीसाठी प्रचार केला होता. परंतु, त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. घराणेशाही, भ्रष्टाचार, गुंडगिरी आदींबाबत त्यांच्या नेत्यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर महापालिका निवडणूका न लढविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला विलंब झाला आहे. तसेच ‘आप’ने पुण्यात 41 उमेदवारांची घोषणाही केली आहे. तसेच मुंबईत 15, पिंपरी चिंचवडमध्ये 15, कोल्हापूरमध्ये 15 उमेदवारांची घोषणा केली आहे. नाशिकमध्येही पक्षाचे उमेदवार अल्पावधीत जाहीर होतील. पुण्यात 100 पेक्षा जास्त जागा लढविण्याची पक्षाने तयारी केली आहे, असेही किर्दत यांनी नमूद केले. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची मुंबई, पुण्यात जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाचे नेते संजय सिंह, राघव चढ्ढा आदी नेतेही प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT