Lok Sabha Election Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर पुणे,नागपूरमध्ये लाखोंची रक्कम जप्त

Seized 65 Lakhs While Inspecting the Vehicles in Pune : पुण्यात भरारी पथाकांनी वाहनांची तपासणी करत जप्त केली ६५ लाखांची रक्कम, चौकशी सुरू.

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. बहुतांश मतदारसंघात उमेदवारी निश्चित झाली असून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. निवडणुकीची घोषणा केलेल्या दिवसांपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेशी संबधित सर्व घटकांना केल्या आहेत.

महाराष्ट्रात (Maharashtra) 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून पाच टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

तर काही मतदारसंघातील उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान झाले होते. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहिता असल्याने ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात जवळ बाळगता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आचारसंहिता सुरू असल्याने कारणाशिवाय अधिक रक्कम जवळ बाळगणाऱ्यांची तपासणी करून, चौकशी करत त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. आचारसंहिता सुरू असतानाही लाखो रूपयांची रक्कम जवळ बाळगणाऱ्यांवर पुणे, नागपूर (Nagpur) येथे कारवाई करण्यात आली.

भरारी पथकांनी वाहनांची तपासणी करून पुणे शहर आणि जिल्हा परिसरातून सुमारे 65 लाख रूपयांची जप्त करण्यात आली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एका खासगी गाडीची तपासणी केली. त्यावेळी त्यात 13 लाख 90 हजार 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या.

तर दुसऱ्या घटनेत शिरुर पोलिसांनी शहरातील कमान पुलाजवळ कारवाई केली. या ठिकाणी एका वाहनातून 51 लाख 16 हजार रुपये जप्त केले. ही सर्व रक्कम कोषागारात ठेवण्यात आली आहे. याची पुढील चौकशी झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

बाहेर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष

लोकसभा निवडणूक पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीने पार पडावी, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विविध भागात निवडणूक आयोगाने भरारी पथके तयार केली असून त्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे.

इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर पथके तैनात करण्यात आली आहेत.

गुजरात आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहन तसेच इतर प्रवासी वाहन यांची पोलीस आणि स्थिर नियंत्रण पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात मतदारांना मतदानासाठी मद्य तसेच पैशाचे आमिष दाखवले जाते.

याला आळा बसावा याकरिता निवडणूक आयोगामार्फत कठोर अशी पावले उचलली जात आहेत. पोलिस, (Police) भरारी पथके तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी पथके नेमण्यात आली आहेत.

नागपूरमध्ये देखील झाली कारवाई

पुणे शहर, जिल्ह्याप्रमाणे भरारी पथकाने नागपूर येथे देखील कारवाई करत रोकड जप्त केली. या कारवाईत एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नागपूर चंद्रपूर हायवे वर एका स्कॉर्पिओ गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली.

ही रक्कम कोणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT