Pune News: राज्यात सत्तेत एकत्र नांदत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर मात्र विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. पुण्यात दोन्ही पक्षांतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काल महिला नगरसेविकेशी झालेल्या वादानंतर आज थेट नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अंक पहिला: नगराध्यक्षांची 'ती' भाषा आणि महिला नगरसेविकांचा ठिय्या
भोर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीपासूनच सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधक भाजपमध्ये धुसफूस सुरू होती. सभेदरम्यान राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी भाजपच्या एका महिला नगरसेविकेचा एकेरी उल्लेख करत असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप झाला. सभासदांना एकेरी भाषेत बोलत "ए खाली बस..." असं नगराध्यक्ष म्हणाले यामुळे भाजपच्या महिला नगरसेविका चांगल्याच आक्रमक झाल्या.
"नगराध्यक्षांचा 'मी म्हणेन ती पूर्व दिशा' असा मनमानी कारभार सुरू आहे," असा घणाघाती आरोप करत भाजप नगरसेविकांनी सभागृहात थेट नगराध्यक्षांच्या टेबलसमोर ठिय्या मांडला.
नगराध्यक्षांनी लेखी माफी मागावी, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढता दबाव पाहून नगराध्यक्ष आवारे यांनी साध्या कागदावर लेखी माफीनामा दिला; मात्र भाजप नगरसेविकांनी तो फेटाळत अधिकृत लेटरहेडवरच माफी हवी, असा हेका धरल्याने पहिल्या दिवशी सभागृह गोंधळातच आटोपले.
अंक दुसरा: "दम असेल तर करून दाखवा..." चालू सभेत राडा
कालचा वाद शांत होतो न होतो, तोच आज सभेच्या दुसऱ्या दिवशी संघर्षाने हिंसक वळण घेतले. राष्ट्रवादीचे नगरसेवक कुणाल धुमाळ आणि भाजपचे नगरसेवक सुमंत शेटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सभागृहात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे कुणाल धुमाळ यांनी "दम असेल तर करून दाखवा" असे थेट आव्हान भाजप सदस्यांना दिले. या विधानामुळे भाजपचे नगरसेवक संतप्त झाले आणि पाहता पाहता दोन्ही बाजूचे नगरसेवक चालू सभागृहातच एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुदैवाने इतर सदस्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
भाजपकडून निलंबनाची मागणी
या राड्यानंतर भाजप नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादीच्या संबंधित नगरसेवकांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. राज्यात वरिष्ठ पातळीवर महायुतीचे सरकार असले, तरी भोर नगरपालिकेत सलग दोन दिवस झालेला हा 'राष्ट्रवादी विरुद्ध भाजप' संघर्ष अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.