Ghodganga Sugar Factory News Sarkarnama
पुणे

Ghodganga Sugar Factory: 'घोडगंगा' श्रेयवादावर शिरूरकर संतापले! आजी-माजी आमदारांना थेट इशारा; म्हणाले, ‘याद राखा!’

Shirur Politics: सर्वांना सोबत घेऊन बैठका घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष सुरेश थोरात यांनी दिला.

सरकारनामा ब्यूरो

भरत पचंगे

शिक्रापूर: न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या मुंबईतील बैठकीत थेट श्रेयवाद दिसून आलेला असून तो अत्यंत गंभीर आहे. शिरुरकरांची घोडगंगा सुरू होणे ही, स्वाभिमानाची लढाई असून ही लढाई सर्वांना घेवून लढण्याचे थेट आवाहन आम्ही आजी-माजी आमदारांना करीत आहोत.

दोघांनीही एकत्रित आणि आम्हा सर्व तालुकावासियांना सोबत घेवून लढाई न लढल्यास तालुक्यात आम्ही तीव्र आंदोलन करु असा थेट इशारा तालुक्यातील २२ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने शिरुर तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश थोरात, के.के.गुजर, कांतीलाल गवारे आदींसह अनेक पदाधिका-यांनी दिली.

न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन बैठका घेण्याची गरज असताना, कारखाना सुरू करण्याच्या विषयातच श्रेयवाद सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील बैठकीवरून स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बैठकांना कारखाना व्यवस्थापन, सर्व संचालक आणि २२ हजार सभासदांपैकी किमान १० टक्के सभासद यांना न सांगता अशा बैठका केल्या तर याद राखा; सर्वांना सोबत घेऊन बैठका घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष सुरेश थोरात यांनी दिला.

थोरात म्हणाले, 'माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांचा पराभव करून माऊली कटके यांना आम्ही शिरुरकरांनी विजयी केले, ते याच आशेने की, त्यांनी एका वर्षात घोडगंगा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता कारखाना सुरू होण्यासाठी शेतकरी, कामगार आणि तालुक्यातील सर्व घटक डोळे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेत राजकीय श्रेयवाद करुन ठराविक लोकांना बैठकीला बोलावून काही चुकीचे व ठराविक लोकांना लाभ होतील असे निर्णय घेत असाल तर त्याला आम्हा तमाम शिरुरकरांना मोठा विरोध आहे.

घोडगंगा कारखान्याच्या खेळत्या भांडवलासाठी 'मार्जिन मनी कर्जा’चा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून कर्ज मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत कारखाना व्यवस्थापनासोबत पुन्हा बैठक घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. त्यामुळे कारखाना व्यवस्थापन, विद्यमान पदाधिकारी आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊनच पुढील बैठक घेणे आवश्यक आहे. पर्यायाने या पुढे सर्वांना लेखी कळवून किंवा जाहीर आवाहन करुन बैठका घेण्याचे आवाहनही थोरात यांनी केले.

कारखाना सुरू करण्याचा प्रश्न हा कोणत्याही एका व्यक्तीचा अथवा पक्षाचा नसून, हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नाचे राजकारण न करता शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही थोरात यांनी केली.

‘घोडगंगा सुरू करण्याचे श्रेय कोणाला मिळते, यापेक्षा कारखाना कधी सुरू होतो, हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, श्रेयवादासाठी कारखाना सुरू होण्यास विलंब झाला किंवा संबंधितांना डावलून निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला, तर शिरूर तालुक्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,’ असा इशाराही थोरात यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT