Pune Railway Administration Sarkarnama
पुणे

Pune News: पुण्यावर IBची नजर; घातपाताचा संशय? 'या' ठिकाणांची विशेष काळजी घ्या!

Sudesh Mitkar

Pune News : पुणे शहर हे नेहमीच देश विरोधी कारवाई करणाऱ्यांच्या रडारवर राहिले आहे. यापूर्वी देखील अनेकदा पुण्यामध्ये घातपाताचे प्रकार झाले. तर बहुतांश वेळा गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने ते हाणून पाडण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील घडामोडींवर गुप्तचर यंत्रणेची बारीक नजर सातत्याने असल्याचं दिसते. आता गुप्तचर यंत्रणेकडून रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासनाला काही उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा बलाची नुकतीच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच आयबी (IB) सोबत बैठक झाली. बैठकीमध्ये गुप्तचर यंत्रणेने रेल्वे प्रशासनाला काही संशयित ठिकाणी सांगितली आहेत. त्या ठिकाणी घातपाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. संवेदनशील भागातून जाणाऱ्या ट्रॅकची देखील माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे.

गुप्तचर यंत्रणेला पुणे परिसरात जवळपास 20 संशयित ठिकाणी आढळली आहेत. या 20 ठिकाणांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. आता लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून जेणेकरून संभावित होणाऱ्या रेल्वे संदर्भातील घातपाताच्या कृतींना वेळीच आळा घालता येईल. संवेदनशील भागातील गस्त वाढवण्यात येणार असून विविध स्तरावर सुरक्षा संदर्भातील उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये काही दिवसांपूर्वी कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडून आणण्यासाठी ट्रॅकवर गॅस सिलिंडर, पेट्रोलने भरलेली बाटली आणि एका पिशवीत ज्वलनशील पदार्थ ठेवल्याचे आढळून आले होते. यामुळे मध्ये मोठा घातपाताचा संशय असल्याने राष्ट्रीय तपास संस्थाने (एनआयए) खोलवर तपास सुरु केला आहे.

काही दिवसापूर्वी सोलापूर रेल्वे महामार्गावरील कुर्दुवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात घडून आणण्यासाठी काही व्यक्तींनी रेल्वे ट्रॅकवर सुमारे २३० किलोचे 'स्लीपर' ठेवल्याचे आढळले होते. सुदैवाने हा प्रकार गॅंगमॅन वेळीच लक्षात आल्याने त्याने स्लीपर ट्रॅकवरून हटविले. अन्यथा त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशाच प्रकारच्या घातपाताची शक्यता पुणे विभागात देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'आयबी'ने रेल्वे प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT