Maharashtra politics News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या भेटीवेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार उपस्थित नसल्याने या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात होते. भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वावरून काही वेगळे राजकारण शिजत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राष्ट्रवादीने या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या दिग्गज नेत्यांनी काल रात्री नवी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. पक्षातील महत्त्वाचे नेते एकाचवेळी शाह यांच्या भेटीला गेल्याने या भेटीमागे नेमका कोणता राजकीय अजेंडा होता, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.
विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि राजकीय भूमिकांबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत अमित शाह यांची भेट घेतल्याने या भेटीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शाह यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा केली होती. त्याच भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ स्वतंत्रपणे शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. तसेच या भेटीसाठी वेळ देण्याची विनंतीही केली होती.
त्यामुळे दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची भेट ही पूर्वनियोजित आणि औपचारिक स्वरूपाची होती. या भेटीत संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रश्न मांडले. तसेच अजित पवार यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा झाल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. काही अदृश्य शक्तींकडून पक्षात अंतर्गत मतभेद आहेत आणि नेतृत्वामध्ये समन्वय नाही, असे कथानक जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.