Pune News | Adv Pravin Chavhan Sarkarnama
पुणे

Pune News : सरकारी वकीलानेच उकळली 'सव्वाकोटी'ची खंडणी : गुन्हा दाखल!

Pune News : देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राइव्हचा `बॉम्ब` टाकून मोठी खळबळ उडवून दिली होती,

सरकारनामा ब्यूरो

Pune News : विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ज्यांच्यावर पेन ड्राइव्हचा `बॉम्ब`टाकून दहा महिन्यांपूर्वी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती, ते विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण (Adv Pravin Chavahan) यांच्यासह तिघांवर सव्वा कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरच्या दीड वर्षानंतर फडणवीस हे गृहमंत्री असताना हा गुन्हा नोंद झाला आहे.

डेक्कन पोलिस ठाण्यावरील फसवणुकीच्या गुन्ह्यात दाखल ख़टल्यात अॅड. चव्हाण हे विशेष सरकारी वकील आहेत. त्यातील आरोपी आणि जळगाव येथील व्यावसायिक सुनील झंवर यांच्याकडे एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आता डेक्कन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सुनील यांचा मुलगा सूरज हा त्यात फिर्यादी आहे. याबाबत माहिती देण्याचे डेक्कन पोलिसांनी टाळले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांच्याशी वारंवार संपर्क करूनही तो झाला नाही. दरम्यान, "हा खोटा गुन्हा असून दीड वर्षानंतर तो दाखल झाला असल्याने त्यामागील उद्देश स्पष्ट होत आहे," असे अॅड. चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना गेल्यावर्षी मार्चमध्ये विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत हा `पेन ड्राईव्ह बॉम्ब` फोडला होता. सरकारी वकील चव्हाण यांना हाताशी धरून राज्य सरकार भाजप नेत्यांविरुद्ध षडयंत्र रचले असल्याचा आरोप त्यांनी या पेन ड्राईव्हमधील रेकॉर्डेड संभाषणाच्या आधारे केला होता.

१२५ तास रेकॉर्डिंग असलेले २९ पेन ड्राईव्ह त्यांनी सादर केले होते. मूळचे जळगावचे अॅड. चव्हाण यांच्या मुंबईतील कार्यालयाच्या भिंतीवरील घड्याळात छुपा कॅमेरा बसवून हे पेन ड्राईव्ह तयार करण्यात आले होते. यामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, हा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुसका असल्याचे प्रत्युत्तर त्यावेळी सरकारमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिले होते.

जळगाव येथे मुख्यालय असलेली भाईचंद हिराचंद सोनी मल्टिस्टेट पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्यानंतर तिच्या मालमत्तेचा लिलाव झाला. त्यात फिर्यादीचे वडील सुनील झंवर यांनी पुण्यातील घोले रोड, पिंपरी-चिंचवडमधील निगडी आणि नसिराबाद येथील मिळकती खरेदी केल्या. घोले रोडवरील मालमत्तेप्रकरणी सुनील झंवर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यात डेक्कन पोलिसांनी त्यांना अटक केली.

यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती पाहून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. याबाबत दाखल झालेल्या खटल्यात अॅड चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी उदय पवार याच्यामार्फत सूरज यांना ‘तुझ्या वडिलांची चार-पाच वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो. वडिलांना जामीनावर सोडायचे असल्यास दोन कोटी रुपयांची व्यवस्था कर, अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी पवार याला रोख एक कोटी २२ लाख रुपये झंवर कुटुंबाने दिले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्यानंतर चव्हाण याने ‘मी आणि शेखर सोनाळकर तुझे सर्व कामे करून देतो’, असे सांगितले. परंतु, त्याने ते केलेच नाही. उलट सुनील झंवर यांनी मिळकती विकत घेताना ६१ कोटींची अफरातफर केल्याचा अहवाल सादर केला. येरवडा कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी चव्हाण आणि पवार यांना पैसे परत मागितले.मात्र, ते न देता चव्हाणने फोनवर धमकी दिली, म्हणून पोलिसांत आलो,असे फिर्यादीत नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT