Voter List Fraud Maharashtra : देशभर 'एसआयआर'चा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. मतदार यांद्यामधून मतदारांची नावे परस्पर वगळली जात आहे. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप विरोधकांनी करत त्यांना हटवण्याची मागणी लावून धरली आहे.
यावरून केंद्रीय निवडणूक आयोग सावध झाले असून, मतदार याद्यांमधील मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकारावर थेट कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील पिंपरीमधील मतदारांची पत्ते परस्पर दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित करण्याच्या प्रकारावरून थेट गुन्हा नोंदवला आहे.
मतदारांची कोणतीही संमती न घेता त्यांच्या मतदार यादीतील (Voter List) पत्ते परस्पर दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित करणे, मूळ मतदारसंघातील नावे वगळणे, असे प्रकार घडले आहेत. यासाठी चार मोबाईल क्रमांकांचा वापर करून त्रयस्थ व्यक्तींनी फॉर्म क्रमांक आठ भरत तब्बल 39 मतदारांची नावे वगळल्याचे निवडणूक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यानंतर पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर निगडी पोलिसांत याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंघातील रहिवासी असणाऱ्यांची नावे दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) अजित गव्हाणे यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी 58 मतदारांची यादी जोडून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी अशा प्रकारची प्रकरणे 15 हजारांहून अधिक असल्याचा दावाही गव्हाणे यांनी केला होता.
या तक्रारीनंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर मार्च 2025 मध्ये दोन पत्रे पाठविली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाणे, खेड-आळंदी, आंबेगाव, खडकवासला, नाशिक पूर्व, भोसरी, कोथरूड आणि पिंपरी येथील आठ निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले होते.
पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जयराज देशमुख यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. मतदार यादीच्या कामकाजादरम्यान ऑक्टोबर 2024 मध्ये ऑनलाइन प्रणालीवर मतदारांचे निवासस्थान बदलण्यासाठी नमुना क्रमांक आठचे अर्ज दाखल झाले होते.
या अर्जाची प्राथमिक पडताळणी केली असता, पाच ऑक्टोबर 2024रोजी तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून त्रयस्थ व्यक्तींनी 39 मतदारांचे फॉर्म क्रमांक आठ ऑनलाइन भरल्याचे आढळले. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2024 रोजी आणखी एका मोबाईल क्रमांकावरून एका मतदाराचा अर्ज भरला. त्यामुळे चार मोबाईल क्रमांक पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.