Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने आता थेट जमिनीखालून रस्ते उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील पाताळ लोक प्रकल्पांतर्गत शहरात तब्बल ३१ किलोमीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
यामध्ये भोसरी ते उंड्रीदरम्यान २३ किलोमीटरचा, तर भूगाव ते एरंडवणे यादरम्यान आठ किलोमीटरचा भुयारी मार्ग उभारण्याचा प्राथमिक विचार आहे. या दोन्ही मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडविण्याच्या दृष्टीने पाताळ लोक प्रकल्पाने पुढचे पाऊल टाकले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, वाहनांची संख्या वाढल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी गंभीर बनली आहे. यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी भुयारी मार्गांचा पर्याय पुढे आला आहे. यापूर्वी थेरगाव ते कात्रज असा भुयारी मार्ग उभारण्याची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो प्रस्ताव मागे पडला. आता वाहतुकीच्या प्रत्यक्ष आकडेवारीचा आणि भविष्यातील शहर विस्ताराचा अभ्यास करून दोन नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
पहिला आणि सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग भोसरी ते उंड्रीदरम्यान प्रस्तावित आहे. सुमारे २३ किलोमीटरच्या या मार्गातून भोसरी, संगमवाडी, धोबीघाट पुणे कॅन्टोन्मेंट, कोंढवा आणि उंड्री हे भाग जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहराच्या उत्तर भागातून दक्षिण भागात जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. भविष्यात पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
दुसरा भुयारी मार्ग भूगाव येथील राम नदीपासून एरंडवणे येथील डी. पी. रोडपर्यंत प्रस्तावित आहे. आठ किलोमीटरच्या या मार्गात राम नदी, डुक्कर खिंड आणि डी. पी. रोड अशी जोडणी असेल. पश्चिम पुण्यातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासह डुक्कर खिंड परिसरातील भौगोलिक अडथळा पार करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरू शकतो.
या दोन्ही मार्गांची आखणी करताना केवळ अंदाजावर अवलंबून न राहता वाहतूक पोलिसांच्या मदतीने विविध संस्थांकडील वाहतूकविषयक माहितीचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये टॉमटॉमचा ओरिजिन-डेस्टिनेशन डेटा, गुगल ट्रॅफिक, रिअल-टाइम ट्रॅफिक इंटेलिजन्स, सीएमपी डेटा आणि नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतींचा विचार करण्यात आला आहे.
यापूर्वी पीएमआरडीएने तयार केलेल्या प्रस्तावात एचसीएमटीआर, इनर रिंग रोड आणि आउटर रिंग रोड यांच्याशी आवश्यक जोडणीचा पुरेसा विचार झाला नसल्याचे महापालिकेच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावात स्वतंत्र भुयारी मार्ग उभारण्याऐवजी शहरातील प्रमुख वाहतूक प्रकल्पांची एकमेकांशी सांगड घालण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रस्तावित भुयारी मार्गांचा एचसीएमटीआर, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, उद्यानपूल आणि नदीवरील पुलांशी समन्वय साधण्याचा विचार आहे. महामेट्रो आणि एमएसआरडीसीच्या प्रस्तावित वाहतूक प्रकल्पांचाही एकत्रित अभ्यास केला जाणार आहे. तसेच मेट्रो मार्गांसोबत बससेवेचे नियोजन करून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याचाही प्रस्ताव आहे.
या प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करून सविस्तर व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि वाहतूकविषयक बाबींची तपासणी झाल्यानंतरच प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय घेतला जाईल.
विशेष म्हणजे, या दोन्ही भुयारी मार्गांचा संबंध पुणे महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील क्षेत्रांशी येणार आहे. त्यामुळे विविध यंत्रणांच्या परवानग्या आणि समन्वय ही प्रकल्पासमोरील महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यात असून, डीपीआर, तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.