Citizens crowd PMC offices to file objections after large-scale errors and mismatched entries surface in Pune’s draft voter list ahead of the municipal corporation election. Sarkarnama
पुणे

PMC Election : मतदार यादीवर हरकतींची ढगफुटी; पराकोटीची विसंगती अन् प्रचंड गोंधळ

PMC Election News : पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांतील प्रचंड चुका आणि विसंगतीमुळे तब्बल 22,809 हरकती दाखल झाल्या. शेवटच्या दिवशीच जवळपास 10 हजार हरकती आल्याने प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला आहे.

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

PMC Voter List Objections : पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये चुका, विसंगती आणि गोंधळ उघड झाल्यानंतर अक्षरशः हरकतींची ढगफुटी झाली आहे. एकूण 22 हजार 809 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यापैकी आज (ता.३) शेवटच्या दिवशी तब्बल 9 हजार 863 हरकतींची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आल्याने त्याची तपासणी करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येणार आहे. मात्र, नागरिकांना यातून न्याय मिळणार का हे अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 41 प्रभागात सुमारे 35 लाख मतदार आहेत. विधानसभेसाठी 1 जुलै 2025 रोजी पर्यंत नोंदणी केलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. ही मतदार यादी महापालिकेला मिळाल्यानंतर डाटा स्प्लीट नावाचे ॲप वापरून प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करताना एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जाणे हे प्रकार प्रचंड घडले आहेत. पण एका विधानसभा मतदार संघातील नावे दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात टाकल्याचेही समोर आले आहे. प्रत्येक प्रभागात हजारोंच्या संख्येत मतदारांची पळवापळवी झाल्याने इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

त्यामुळे त्यांच्याकडून प्रशासनावर टिकेची झोड उठली आहे. याचे सर्वपक्षीय पडसाद उमटल्याने निवडणूक आयोगाने हरकती नोंदविण्याची मुदत वाढवून ती 3 डिसेंबरपर्यंत केली होती. ही मुदत आज संपली आहे.

या काळात प्रचंड हरकती दाखल झाल्या आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वाधिक 6 हजार 308 हरकती दाखल झाल्या आहेत., तर सर्वात कमी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात फक्त 87 हरकती आलेल्या आहेत.

‘‘मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करण्यासाठी अधिकारी जागेवर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील. या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार नाही’’

-प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक शाखा

सात दिवसाची मुदत

मतदार यादीवर 22 हजारापेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. असे असताना मतदार यादीवरील हरकतींची दखल घेऊन, प्रत्यक्ष जागा पाहणी करून मतदार याद्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 10 डिसेंबरला प्रशासनाला अंतिम मतदार यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे अवघ्या सात दिवसात मतदार यादी योग्य पद्धतीने दुरुस्ती होणार का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

इतर क्षेत्रीय कार्यालयांतील हरकती पुढीलप्रमाणे :

  • ढोले पाटील - 277

  • येरवडा-कळस-धानोरी - 589

  • नगर रस्ता–वडगाव शेरी - 5617

  • शिवाजीनगर-घोले रस्ता -376

  • औंध-बाणेर-बालेवाडी -434

  • कोथरूड-बावधन -517

  • सिंहगड रस्ता -6308

  • धनकवडी सहकारनगर - 2472

  • वारजे–कर्वेनगर - 1110

  • कोंढवा–येवलेवाडी -1397

  • हडपसर–मुंढवा - 2186

  • वानवडी-रामटेकडी - 953

  • कसबा विश्रामबाग -213

  • बिबवेवाडी - 273

  • भवानी पेठ - 87

  • एकूण - 22,809

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT