Uday Samant| Sarkarnama
पुणे

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर पोलिस रात्रभर झोपलेच नाहीत : पुणे ते हिंगोलीपर्यंत अटकसत्र

Uday Samant | Shivsena | पोलिसांनी रात्रभर शोधमोहिम राबवून पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई केली.

सरकारनामा ब्युरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या ताफ्यावर काल (मंगळवार) रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिस (Pune Police) हायअलर्टवर आले आहेत. मंगळवारी रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. (Uday Samant Attack in pune)

'शिवसंवाद' सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे आणि रुपेश पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. सोबतच १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर शोधमोहिम राबवून पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई केली. याशिवाय या हल्ल्याला चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही पुणे दौऱ्यावर होते. संध्याकाळी आदित्य ठाकरे यांची कात्रज चौक भागात सभा होती. त्याचवेळी तिथून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानामधून शिंदे आणि सामंत यांचा गाड्यांचा ताफा बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाला. यावेळी सामंत यांचा ताफा कात्रज चौकात सिंग्नलला थांबला असतानाच शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेक केली आणि गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्याची माहिती मिळत आहे.

तर सोमवारी दुपारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निष्ठा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच तुम्ही फोडा, तुमचा 'मातोश्री'वर सन्मान करण्यात येईल, असे चिथावणीखोर वक्तव्य हिंगोलीचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केले होते. या प्रकरणी हिंगोलीतील सचिन प्रकाश पवार यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बबनराव थारोत यांनी शांतता भंग व्हावी, असे वक्तव्य केल्याची तक्रारही दाखल केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने थोरात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT