Pune Police | Amitesh Kumar | Police Constable Controversy sarkarnama
पुणे

Pune Police : बदली मनासारखी झाली नाही म्हणून थेट पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर राडा; पोलीस दलात खळबळ!

Pune Police Constable Controversy : पुणे पोलीस दलातील बदल्यांचे धोरण आणि अंतर्गत नाराजीचाही विषय चर्चेत आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळाला जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. या काळात बदल्या, नियुक्त्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईवरून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते.

Sudesh Mitkar

Pune News, 04 Nov : पोलीस दलातील अंतर्गत नाराजी आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. मनासारखी बदली न झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्याबाहेर जाऊन गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. अमोल भिसे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने कथित मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल भिसे हा मंगळवारी सायंकाळी चारचाकी वाहनातून पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचला. आणि त्यांनी थेट बंगल्याच्या परिसरात गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने बंगल्याबाहेर गोंधळ घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

भिसे याची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. मात्र, ही बदली आपल्या अपेक्षेप्रमाणे न झाल्याने तो नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून त्याने थेट पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आपला संताप व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. मात्र, गुन्ह्याचे नेमके स्वरूप आणि पुढील कारवाईबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

बदल्यांमधील नाराजी पुन्हा चर्चेत

या घटनेने केवळ एका कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा मुद्दा समोर आणलेला नाही, तर पुणे पोलीस दलातील बदल्यांचे धोरण आणि अंतर्गत नाराजीचाही विषय चर्चेत आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळाला जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. या काळात बदल्या, नियुक्त्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईवरून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, पोलीस दलात शिस्त आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन याला महत्त्व असताना, एका कर्मचाऱ्याने थेट पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन गोंधळ घातल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. आता या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यावर नेमकी कोणती कारवाई होते आणि बदली प्रक्रियेबाबत वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT