Pune News : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सलग दोन दिवस पुण्यात केलेल्या कारवाईनंतर, पोलीस प्रशासनाने आज एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. लाजखोर दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एपीआय वैशाली तोटेवार यांची १ मे रोजी मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पदोन्नतीवर बदली झाली होती. पुण्यातून कार्यमुक्त झाल्यानंतरही त्यांनी जुन्या प्रकरणातील तक्रारदाराशी संपर्क साधला. एका खासगी व्यक्तीमार्फत त्यांनी लाचेची मागणी केली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून या अधिकाऱ्याला रंगेहात हात पकडला आहे.
तर दुसरीकडे, लोहगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी तर निर्लज्जपणाचा कळस गाठला. एका १७ वर्षांच्या मुलावर दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी तब्बल ८० हजार रुपयांची मागणी केली होती. लोहगाव पोलीस ठाण्यातच ही लाच स्वीकारताना एसीबीने त्यांना 'ट्रॅप' लावून रंगेहाथ पकडले. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी बरुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
एकाच दिवशी दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन होण्याची पुणे पोलीस दलातील ही पहिलीच वेळ मानली जात आहे. "कर्तव्य बजावत असताना भ्रष्टाचारी आणि नैतिक अध:पतन केल्याने खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे," असे स्पष्ट मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.