Pune Police : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झालेला नसतानाच या कायद्यांतर्गात पुणे पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. यामुळं पुणे पोलिसांना नेमकी कसली घाई झाली होती? की कोणत्या राजकीय दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला होता? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कारण महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याची अधिसूचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी निघाली असून त्यानुसार, २८ ऑगस्ट २०२६ पासून या कायद्याची अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.
फुरसुंगी आणि खडक पोलीस ठाण्यात 5 आणि 9 ऑगस्ट रोजी असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये बेकायदा धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, संबंधित कायदा 28 ऑगस्ट 2026 पासून अंमलात येणार असल्याने, कायदा लागू होण्यापूर्वीच त्यातील कलमांनुसार गुन्हा कसा दाखल झाला, असा सवाल उपस्थित झाला आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्यात 5 ऑगस्ट रोजी एका मुलीचं धर्मांतर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाण्यात ब्रिटनहून पुण्यात आलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात कारवाई करण्यात आली. गुरुवार पेठेतील एका चर्चमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता.
आरोपानुसार, संबंधित ब्रिटिश नागरिकाने वारकरी संप्रदायासारखा पेहराव करून कीर्तनकाराची भूमिका घेत अभंग आणि कीर्तन सादर केले. मात्र, या माध्यमातून येशू हाच सर्वस्वी देव असल्याचे सांगत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यात आला आणि उपस्थित नागरिकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
मात्र, या संपूर्ण कारवाईत पोलिसांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यातील तरतुदी 28 ऑगस्टपासून लागू होणार असताना, त्याआधीच पुणे पोलिसांनी या कायद्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल केल्याचा दावा केला जात आहे. कायदा लागू होण्यापूर्वीच त्यातील कलमांचा वापर करून गुन्हा दाखल केल्याने ही कारवाई कायदेशीरदृष्ट्या टिकणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ब्रिटिश नागरिकाविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपूर्वीचा असल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणावर अॅडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी आक्षेप घेतला आहे. संबंधित कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच त्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी ब्रिटिश नागरिकाविरोधात दाखल केलेला गुन्हा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर पुणे पोलिसांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच कायदा लागू होण्यापूर्वी लावण्यात आलेली संबंधित कलमं मागे घेण्याची शक्यता असल्याची माहितीही समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.