Maharashtra Police
Maharashtra Police 
पुणे

फक्त लाच मागितली म्हणून पोलीस शिपायाला झाली अटक

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : लाच स्वीकारली म्हणून सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक केली जाते. लाच देणाऱ्याविरुद्ध तक्रार आल्यास त्याचावरही कारवाई होते. केवळ लाच मागितली म्हणूनही लाचखोरीचा (Bribery) गुन्हा दाखल होऊन अटक होते. आज तसेच घडले. चोरीचा माल घेतल्याचा आळ आणून त्यात आरोपी न करण्यासाठी करणसिंग निहालसिंग जारवाल या पुणे ग्रामीणमधील (Pune Rural Police) पोलीस शिपायाने लाच मागितली. त्याबद्दल गुन्हा नोंदवून  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्याला आज अटक केली.

ही घटना जानेवारीती महिन्यातील आहे. त्याबाबत आलेल्या तक्रारीची 6 सप्टेंबरला एसीबीने पडताळणी केली. त्याप्रकरणी आज (ता.४) शिरूर पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल होऊन त्यात जारवालला अटक झाली आहे. तो सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. शिरूर पोलीस ठाण्यात असताना त्याने लाच मागितली होती. या घटनेतील तक्रारदाराने जानेवारीत चार लाख रुपये डिपॉझिट भरून एक जुने जेसीबी मशीन एका व्यक्तीकडून चालवायला घेतले होते.

जारवालने ते चोरीचे असल्याचे तक्रारदाराला सांगून ते पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ते शिरूर पोलीस ठाण्यात जमा केले. त्यावर ज्यांच्याकडून जेसीबी घेतले त्यांच्याविरुद्धच चोरीचा गुन्हा नोंदविल्याचे जारवालने सांगितले. त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल म्हणजे जेसीबी घेतला म्हणून त्यात आरोपी करून अटक करण्याची धमकी जारवालने तक्रारदाराला दिली. ते करायचे नसेल, तर 50 हजार रुपयांची मागणी त्याने केली . नंतर तडजोड म्हणून त्याने रक्कम 20 हजार रुपयांवर आणली होती. अखेर लाच मागितली म्हणून जारवालला अटक झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप वर्हाडे हे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT