सीबीआयला दणका! विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीविना आमदारांवरील कारवाई भोवली

विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीविना आमदारांवर कारवाई करणे सीबीआयला महागात पडले आहे.
West Bengal Assembly
West Bengal Assembly

कोलकता : उच्च न्यायालयाने (High Court) आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) दणका दिला. विधानसभा अध्यक्षांच्या (Assembly Speaker) परवानगीविना आमदारांवर कारवाई करणे सीबीआयला महागात पडले आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आजच्या आज हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर तातडीने सीबीआयचे अधिकारी विधानसभेत येऊन अध्यक्षासमोर हजर झाले.

सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे (TMC) तत्कालीन आमदार सुब्रत मुखर्जी, फिरहाद हकीम आणि मदन मित्रा यांना अटक केली होती. त्यावेळी मुखर्जी आणि हकीम हे मंत्री होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. नारद स्टिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, या आमदारांच्या विरोधात कारवाई करताना विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांची परवानगी सीबीआयने घेतली नव्हती.

सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालयाने (ED) आमदारांवर कारवाई करताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली नसल्यावरून गदारोळ उडाला होता. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आधेश दिले होते. याला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर उच्च न्यायालयाने सीबीआयला दणका देत आजच्या आज विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. यानुसार सीबीआयचे पथक आज अध्यक्षांसमोर हजरही झाले.

तृणमूल नेत्यांना सीबीआयने 17 मार्चला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी त्या थेट सीबीआयच्या कार्यालयावर धडकल्या होत्या. मला अटक करा, असे आव्हान त्यांनी सीबीआयला दिले होते. तसेच, त्या 6 तास कार्यालयातच ठिय्या देऊन बसल्या होत्या. त्यावेळी तृणमूलचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सीबीआयच्या कार्यालयाबाहेर जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर न्यायालयात या कारवाईला आव्हान देण्याचे जाहीर करुन ममता बॅनर्जी तेथून बाहेर पडल्या होत्या.

काय आहे नारद स्टिंग ऑपरेशन?

नारद स्टिंग ऑपरेशनमधील गैरव्यवहार हा मार्च २०१६ मधील विधानसभा निवडणुकीवेळी झाला होता. नारद न्यूज पोर्टलचे मॅथ्यू सॅम्युअल यांनी निवडणुकीआधी व्हिडिओ चित्रफीत प्रसारित करीत पश्‍चिम बंगालच्या राजकारणाला मोठा धक्का दिला होता. या चित्रफीतीत ते एका कंपनीचे प्रतिनिधीच्या रूपात दिसून आले. तृणमूल काँग्रेसचे सात खासदार, तीन मंत्री आणि कोलकता महापालिकेचे महापौर सोवन चॅटर्जी यांना कामाच्या बदल्यात ते मोठी रक्कम देत असल्याचे दिसू आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com