Ajit Pawar| Vasant More
Ajit Pawar| Vasant More Sarkarnama
पुणे

Pune Politics: अजितदादांची खुली ऑफर; वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?

सरकारनामा ब्युरो

MNS Vasant More news: मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) येण्याची खुली ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे मोरे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांनी आतापर्यंत अनेक वेळा पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्याही चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु होत्या. असे असतानाच शहरातील एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्याच सोहळ्याला अजित पवार यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही आले होते. दोघांनीही एकमेकांना नमस्कार करत एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्याच वेळी अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय’ अशी खुली ऑफरच वसंत मोरे यांना देऊन टाकली.

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका घेतली होती. पण माझ्या प्रभागातील मुस्लिम बांधवांच्या मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही, अशी पक्षविरोधी भूमिका मोरे यांनी घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना तत्काळ शहराध्यक्ष पदावरून हटवले होते. तेव्हापासुन मोरे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तेव्हापासून विविध पक्षांच्या प्रमुखांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याच्या खुल्या ऑफर दिल्या. पण काही दिवसातच राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत मोरेंची नाराजी दूर केली. आणि त्यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली.

त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसे शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवरून मोरेंनी आपली नाराजी व्यक्त केली. हीच संधी साधत एका विवाह सोहळ्यात अजित पवार यांनी मोरेंना राष्ट्रवादीची खुल्ली ऑफर दिल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या वेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख शहर नेत्यांनी आमचे नाही किमान दादांचे (अजित पवार) तरी ऐका, असे आवाहनही मोरे यांना केले.

दरम्यान, या संदर्भात वसंत मोरे यांना या ऑफरबद्दल विचारले असता त्यांनीही अजित पवार यांनी दिलेल्या ऑफरला दुजोरा दिला. राज्याचा एवढा मोठा नेता स्वतः त्यांच्या पक्षात येणाचे निमंत्रण देतात, हा अजित पवार यांच्या मनाचा मोठेपणा आणि माझ्या कार्याची पावती आहे, असे मी मानतो. पण, पक्ष बदलण्याबाबत मी कोणताही विचार केलेला नाही, असंही मोरे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT