Porsche Car Accident Pune Sarkarnama
पुणे

Porsche Car Accident Case : सुटका झाली तरी 'त्याला' 300 शब्दांचा निबंध लिहावाच लागणार !

Chaitanya Machale

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या मुलाची बाल सुधारगृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी बाल न्याय मंडळाने घातलेल्या अटींची पुर्तता या अल्पवयीन मुलाला करावीच लागणार आहे. बाल न्याय मंडळाने या मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहावा लागणार असून 15 दिवस वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करावा लागणार आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवित एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात 19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातानंतर नागरिकांनी या मुलाला कारमधून बाहेर काढून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

संबधित मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. त्यावेळी न्याय मंडळाने त्याला 300 शब्दांचा निबंध लिहण्याची शिक्षा सुनावत वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास व्हावा, यासाठी 15 दिवस वाहतूक नियमन करण्यास सांगत या मुलाला जामीन मंजूर केला होता.

दोन जणांचा बळी घेणाऱ्या या मुलाला अवघ्या 15 तासात जामीन मंजूर करण्यात आल्याने सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात होती. हा अल्पवयीन मुलगा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला हा जामीन मंजूर केल्याची टीका केली जात होती. पोलिस तसेच न्याय व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील बाल न्याय मंडळाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते. यानंतर पुणे पोलिसांनी फेरविचार अर्ज केल्यानंतर न्याय मंडळाने मुलाला दिलेला जामीन रद्द करत त्याला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.

या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर त्याची सुटका न करता त्याचा बालसुधारगृहातील मुक्कामात वाढ केली जात होती. याविरोधात या मुलाच्या नातेवाईकांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. याची दखल घेत दोन्ही बाजु ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने या मुलाचा जामीन मंजूर करत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार त्याची सुधारगृहातून लवकरच सुटका करून त्याला त्यांच्या आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच त्याचे समुपदेशन करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या मुलाची सुटका होणार असली तरी बाल न्याय मंडळाने ज्या अटी घातल्या होत्या त्याचे पालन करण्याचे बंधन हायकोर्टाने घातले आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहण्याबरोबरच 15 दिवस वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करावा लागणार आहे. दरम्यान, हायकोर्टाने (Court) या अल्पवयीन मुलाचा जामीन मंजूर केला असला तरी त्याच्याकडून झालेल्या अपराधाची शिक्षा त्याला कशी मिळेल, यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT