Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : 'वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल; पण 'हा' प्रश्न मार्गी लावणारचं...'

Rashmi Mane

Pune News : पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या विमानतळासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध होत नसल्याने या विमानतळाच्या कामात काही अडचणी येत आहेत. त्यामुळे हे विमानतळ या परिसरात होईल की नाही. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या जागा ताब्यात घेण्यासाठी त्याचे भू संपादन करण्याची जबाबदारी सुरुवातीच्या काळात राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण यांच्याकडे दिली होती.

पुरंदर येथील विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी एका कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली. 'थोडा वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, परंतु पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावच लागेल'. पुढील 50 वर्षे लक्षात घेवून हा निर्णय घ्यावा लागणार आहे. पुढील काळात विमानतळाबाबत कठोर निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत अजितदादांनी दिले आहेत. विमानांची वाढती संख्या आणि विमानतळांसाठीची अपुरी जागा याबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने पुढील काही महिन्यात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरंदर तालुक्यातील आठ गावांमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. सात वर्षापूर्वी 2017 मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी केंद्र सरकारच्या विमानतळ प्राधिकरणाच्या टीम ने पाहणी करून या जागेसाठी ग्रीन सिग्नल देखील दिला होता. मात्र हे विमानतळ उभारताना याच्या आजूबाजूला लॉजिस्टिक पार्क उभारण्यात यावे. यासाठी विमानतळाची पूर्वीची जागा थोडी पुढे घेऊन बारामती (Baramati) तालुक्यातील तीन गावांचा यात समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याबाबतचा पत्रव्यवहार देखील पवार यांनी केंद्र सरकारच्या संबधित विभागाकडे केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळा बरोबरच लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान येथे आहे.

नव्याने सुचविण्यात आलेल्या जागेवर विमानतळ करण्यास विमानतळ प्राधिकरणाने असहमती दाखविलेली आहे. यापूर्वी निश्चित केलेल्या जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी जागा भूसंपादन करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून याच्या बैठका सध्या सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit PAwar) यांनी देखील आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा देत जुन्या ठिकाणीच विमानतळ व्हावे असे स्पष्ट केले आहे.

Edited By: Rashmi Mane

SCROLL FOR NEXT