land acquisition compensation Pune : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागला असून, 7 मे रोजी पासून बाधितांना जमिनीचा मोबदला देण्यास सुरुवात होणार असल्याची घोषणा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.
या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डुडी म्हणाले, पुरंदरमधील सात गावांतील सुमारे 1216 हेक्टर आणि अतिरिक्त 242 एकर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऐतिहासिक दर जाहीर करण्यात आला असून, व्याजासहित प्रति एकर 1 कोटी 61 लाख 1 हजार 915 रुपये इतका मोबदला दिला जाईल.
विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या (Farmer) जमिनींत फळबागा आहेत, त्यांना दुप्पट दर मिळणार आहे. तसेच विहीर आणि बोरवेलसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जवळपास 2 कोटी रुपये जमा होतील आणि या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
जमीन संपादनाची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून, ज्या शेतकऱ्यांचा संमती करार पूर्ण होईल, त्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे तात्काळ पैसे जमा केले जातील. जे शेतकरी सहमती देणार नाहीत, त्यांच्या बाबतीत कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जमिनीच्या दराबाबत कोणताही संभ्रम मनात न बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
केवळ आर्थिक मोबदलाच नव्हे, तर बाधितांच्या भविष्याचा विचार करून प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या जाणाऱ्या जमिनीतील 6500 कुटुंबांतील प्रत्येकी एका सदस्याला नोकरी दिली जाणार आहे.
तसेच, मोठ्या प्रमाणात हाती येणाऱ्या पैशांचा विनियोग कसा करावा, यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. अशी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.