Pune News: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांवर आता वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई सुरू झाली आहे. शहरातील तब्बल १९ लाख ५९ हजार वाहनचालकांनी वाहतूक नियम मोडले असून, त्यांच्याकडून पावणे चारशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. या प्रलंबित दंडाच्या वसुलीसाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या चार दिवसांत ३ कोटी १३ लाख रुपयांचा दंड पुणेकरांकडून वसूल केला आहे. २०१७ पासूनच्या प्रलंबित ई-चलनांमधून एकूण सुमारे ४०० ते ४१० कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे.
या रकमेची वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन नोटिसा पाठवल्या आहेत. वाहनचालकांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवले जाणार असल्याचा पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आला आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी सांगितले की, ही मोहीम वाहतूक शिस्त राखण्यासाठी, नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि पारदर्शक वसुली करण्यासाठी राबवली जात आहे. यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे.
याशिवाय, धुळवड (होळी) निमित्त शहरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील ३० ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार असून. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल आणि अशा वाहनांची तात्काळ जप्ती केली जाईल. यासाठी वाहतूक कर्मचारी २४ तास रस्त्यावर तैनात राहणार आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रलंबित असलेला दंड तातडीने भरावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे.