Pune sugar factory elections gain momentum as Someshwar, Bhima and Karmayogi polls may reshape rural political equations. Sarkarnama
पुणे

Sugar Factory Elections : पुण्यात साखर कारखाना निवडणुकांचा धुरळा : सोमेश्वर, भीमा, कर्मयोगीसाठी मातब्बर नेत्यांची सरसावल्या बाह्या

Pune Sugar Factory Elections : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याने निवडणुकीतील अंतिम चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगण्याची शक्यता असून, बहुरंगी लढतीचीही चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 29 Sep : पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच दौंडमधील भीमा आणि इंदापूरमधील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांचेही पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे आजी-माजी आमदारांसह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

पुणे जिल्ह्यात तब्बल १४ सहकारी साखर कारखाने असून, ग्रामीण अर्थकारणाबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात या कारखान्यांचे महत्त्व मोठे आहे. कारखान्याच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळविणे म्हणजे केवळ सहकारातील सत्ता नव्हे, तर तालुक्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत करण्याची संधी मानली जाते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, कोणाची राजकीय ताकद वाढणार आणि कोणाला धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोमेश्वरनंतर भीमा, कर्मयोगीच्या निवडणुकीकडे लक्ष

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याने निवडणुकीतील अंतिम चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगण्याची शक्यता असून, बहुरंगी लढतीचीही चर्चा आहे. दुसरीकडे, दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे.

त्यामुळे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या कारखान्यावर आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व असून, माजी आमदार रमेश थोरात यांच्याशी संभाव्य सामना रंगण्याची चर्चा आहे. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था प्रतिनिधींचे ठराव पाठविण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने येथेही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संचालकपदातून राजकारणाची ‘साखरपेरणी’

राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकपदापासून झाली आहे. कारखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांशी थेट संपर्क निर्माण होतो. त्यामुळे कारखान्याचे संचालक मंडळ हे नेत्यांसाठी राजकीय ताकद वाढविण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरते.

कारखान्याची आर्थिक स्थिती, ऊस उत्पादकांना मिळणारा दर (FRP), उसाची उचल, बोनस आणि कारखान्याच्या कामकाजाचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम या मुद्द्यांचा निवडणुकीत प्रभाव पडतो. कारखाना फायद्यात ठेवणे आणि सभासदांना आर्थिक लाभ मिळवून देणे, यावर संबंधित नेत्याचे तालुका आणि जिल्हा पातळीवरील राजकीय वजनही अवलंबून असते. पुणे जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असल्याने ग्रामीण राजकारणातील समीकरणांची नव्याने जुळवाजुळव होण्याची शक्यता आहे.

भीमा कारखान्यात कुल-थोरात आमनेसामने येणार?

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत सहा वर्षांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीत कुल यांच्यासमोर माजी आमदार रमेश थोरात यांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. दौंडच्या राजकारणात कुल आणि थोरात यांच्यातील संघर्ष अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही दोन्ही नेत्यांची ताकद तपासली जाणार आहे. भीमा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला सभासदांचा पाठिंबा मिळतो, यावर दौंडच्या आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

सोमेश्वरमध्ये ‘पवार विरुद्ध पवार’; बहुरंगी लढतीची शक्यता

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा सहकाराच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीतील लढतीचे स्वरूप स्पष्ट होईल. विविध राजकीय गटांकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असून, निवडणूक बिनविरोध होणार की बहुरंगी लढत रंगणार, याबाबत उत्सुकता आहे.

कर्मयोगीत भरणे-पाटील समीकरणाची कसोटी

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना हा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. या कारखान्याची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने इंदापूरच्या राजकारणातही हालचाली वाढल्या आहेत. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला समझोता कायम राहणार का, हा या निवडणुकीतील महत्त्वाचा प्रश्न आहे. या समीकरणात भाजप काय भूमिका घेणार, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

भरणे-पाटील यांच्यातील राजकीय समन्वय कायम राहिल्यास निवडणुकीतील लढतीचे स्वरूप वेगळे असू शकते. मात्र, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि सभासदांचे राजकीय गणित यामुळे निवडणुकीत कोणती समीकरणे आकाराला येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत, सोमेश्वर, भीमा आणि कर्मयोगी या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. कारखान्यांच्या सत्तेच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाचीही पायाभरणी होणार असल्याने या निवडणुका नेत्यांसाठी प्रतिष्ठेची परीक्षा ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT