Pune Teachers Constituency : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठीअर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी पुणे शिक्षक मतदारसंघातील जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म दिला आहे. शिवाय आता मंगेश चिवटे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे आता महायुतीत नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश शिवटे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींशी आमची चर्चा झाल्यानंतर पुणे शिक्षक मतदारसंघ देखील शिवसेना लढवणार मंगेश चिवटे तिथून आमचे उमेदवार असतील अशी आमची चर्चा झाली होती."
एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यामुळे आता जर चिवटेंना उमेदवारी दिली जाणार होती तर गावडे यांना भाजपकडून उमेदवारी कशी देण्यात आली? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, याच सगळ्या घडामोडीत अर्ज भरण्यासाठी निघालेले शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, "अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दोन तीन दिवस आहेत. मला नक्की विश्वास आहे की महायुतीचे समन्वय समितीची बैठक या एक दोन दिवसात होईल आणि कदाचित पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपच आपला उमेदवारी अर्ज मागे घेईल आणि शिवसेनेचा घटक पक्षाचा मित्र पक्षाचा उमेदवार म्हणून मला साथ देतील.", असा मोठा दावा चिवटे यांनी केला आहे.
चिवटे यांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन होणार की दोन्ही पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.